ऑनलाइन लोकमत
न्यू यॉर्क, दि. २७ - काश्मीरमध्ये सार्वमत घेण्यात यावे अशी मागणी करत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या सभेत भारतविरोधी राग आळवला. काश्मीरचा प्रश्न सोडवणे ही आमची प्राथमिकता असल्याचेही ते म्हणाले.
संयुक्त राष्ट्राच्या सभेत बोलताना शरीफ यांनी आपण चर्चेद्वारे काश्मीर प्रश्न सोडवण्यास तयार असल्याचा दावा केला. जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना स्वयंनिर्णयाचा हक्क मिळावा, हे आमचे कर्तव्य असून या तंट्यातील एक पक्ष म्हणून आमचा काश्मीरच्या नागरिकांना पाठिंबा आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच भारताने परराष्ट्र सचिव पातळीवरील बोलणी रद्द केल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान शरीफ यांच्या भूमिकेबद्दल भारताने निषेध नोंदवला आहे. शरीफ यांची प्रतिक्रिया असमर्थनीय असल्याचे भारताने म्हटले आहे.