ऑनलाइन लोकमत
काबुल, दि. 15 - अफगाणिस्तान सीमेजवळ असणा-या वजीरिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांविरोधात अभियान सुरू केले आहे. मात्र या कारवाईचा फटका तेथील हजारो पश्तून नागरिकांना बसत आहे, कित्येकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे तर हजारोंच्या संख्येने लोकं बेघर झाली आहेत. स्वतःच्या जीव वाचवण्यासाठी हा नागरिकांनी अफगाणिस्तानमधील खोश्त येथे स्थलांतर केले आहे. आम्हा पश्तून नागरिकांना संपवण्याचा पाकिस्तानचा डाव आहे, असा आरोप पश्तून पीडितांनी केला आहे.
पाकिस्तानी सैन्य आणि वायुसेनेकडून होणा-या हल्ल्यांमुळे हजारो पाकिस्तानी नागरिकांना पश्तून सोडणे भाग पडले आहे. वारंवार होणा-या हल्ल्यांमुळे येथे राहणे कठीण झाले आहे, घर- संसार-संपत्ती सारे काही उद्ध्वस्त झाले आहे. आम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी पाकिस्तान कुठली तरी कारणे नेहमीच शोधत आहे, तसंच गेल्या 40 वर्षांपासून पाकिस्तान आपल्यावर युद्ध थोपवत आल्याचा आरोपही पश्तून नागरिकांनी केला आहे.
यामुळे, वजीरिस्तानमध्ये राहणारे असे अनेक पाकिस्तानी नागरिक आपल्याच सैन्याकडून होणा-या हल्ल्यांना बळी पडत आहेत. 'कोणतीही पूर्व कल्पना न देता पाकिस्तानचे सरकार अचानक हल्ले करतं, आम्हाला काय करायचे आहे?, कुठे जायचे आहे?, याबाबत कोणतीही सूचना न देता आम्हाला लक्ष्य केले जाते, असा आरोपही पश्तून नागरिकांनी केला आहे.
पाकिस्तान लष्कराने केलेल्या हल्ल्यात अख्खीच्या -अख्खी गावे उद्ध्वस्त झाली आहेत. तालिबानविरोधात ही कारवाई सुरू असल्याचे सैन्याकडून सांगण्यात येत आहे.
मात्र, 'कथित दहशतवादी कुठे लपले आहेत, कुठल्या ठिकाणाहून दहशतवादी कारवायांचे कट-कारस्थान रचत आहेत, याची माहिती सैन्याला आहे. ते सर्व दहशतवादी इस्लामाबाद आणि कराचीमध्ये लपले आहेत. वजीरिस्तानमध्ये आम्ही दहशतवाद्यांना कधीही आश्रय दिला नाही. कधीही दहशतवादी कारवायांचे समर्थन केले नाही. पाकिस्तान कधी अमेरिकेसोबत तर कधी स्वतःच्या शेजा-यांसोबत युद्ध पुकारत आला आहे', अशा शब्दांत पश्तून नागरिकांनी पाकिस्तानी सैन्याकडून होणा-या हल्ल्यांचा तीव्र निषेध करत त्यांच्यावर अनेक आरोपही केले आहेत.