अमेरिकेनं अफगाणिस्तानमधून सैन्याला माघारी बोलावल्यानंतर अफगाणिस्तानाततालिबाननं पुन्हा कब्जा मिळवला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या या निर्णयानंतर अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील त्यांच्यावर निशाणा साधला होता. अराजकता माजण्यापासून वाचण्यासाठी अमेरिकन नागरिकांना सुरक्षित, हळूहळू आणि व्यवस्थितरित्या बाहेर काढण्याचा सल्ला ट्रम्प यांनी बायडेन यांना दिला. परंतु ट्रम्प यांच्या या सल्ल्यावरून नेटकऱ्यांमध्ये मात्र भ्रम निर्माण झाला.
बायडेन प्रशासनानं आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी हजारो अमेरिकान सैनिकांना काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचवलं आहे. दरम्यान, अमेरिकन नागरिकांना पहिले या ठिकाणाहून बाहेर काढलं पाहिजे होतं आणि त्यानंतर सैन्याला परत बोलवायला हवं होतं, अशा सूचना त्यांनी केल्या. त्यानंतर त्यांनी आणखी एक सूचना केली की बाहेर निघण्यापूर्वी अमेरिकेला काही ठिकाणी बॉम्ब टाकायला हवे होते.
"पहिल्यानंदा तुम्ही अमेरिकन नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढलं असतं. त्यानंतर सैन्याचं सामान आणलं असतं आणि त्यांनंतर तुम्ही काही ठिकाणी बॉम्ब टाकले असते आणि त्यानंतर सैन्याला बाहेर काढलं असतं. परंतु आपल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केलं त्या उलट्या क्रमानं नसतं केलं. अशा प्रकारे काम केलं असतं तर अराजकता माजली नसती. कोणाचा मृत्यू झाला नसता आणि तालिबानला आपण गेलो हे समजलंही नसतं," असं ते म्हणाले.