Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातीलतालिबानी सत्तेमुळे भारताच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे. तालिबाननंअफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर पाकिस्तानची कुरघोडी आणि भारतीय सीमा सुरक्षित ठेवण्याचं आव्हान भारतासमोर उभं ठाकलं आहे. दक्षिण-पश्चिम आशियात सीआयएचे माजी दहशतवाद विरोधी प्रमुख डगलस लंडन यांनी भारतासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. अफगाणिस्तानावर कब्जा केल्यानंतर तालिबानच्या जोरावर पाकिस्तानच्या कुरघोड्या वाढण्याची शक्यता आहे आणि भारतासाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे, असं ते म्हणाले. डगलस ३४ वर्षांच्या सेवेनंतर २०१९ साली निवृत्त झाले आहेत. (Taliban in Afghanistan is a matter of concern for India says former CIA officer Douglas London)
पंजशीरच्या अहमद मसूदला तगडा झटका; तालिबानच्या हल्ल्यात फहीम दश्ती ठार
"अफगाणिस्तानात जे झालं ते खूप वाईट झालं. हक्कानी नेटवर्कचे पाकिस्तानच्या सैन्यासोबत चांगले संबंध राहिले आहेत आणि याचीच प्रचिती आपल्याला अफगाणिस्तानमध्ये येत आहे", असं डगलस म्हणाले.
डगलस यांचं याच महिन्यात 'द रिक्रूटर: स्पाइंग अँड द लॉस्ट आर्ट ऑफ अमेरिकन इंटेलिजन्स' हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात डगलस यांनी २०२० साली यूएस-तालिबान यांच्यातील शांतता कराराला आजवरचा सर्वात वाईट करार म्हणून संबोधलं आहे.
'आयएसआय'चे प्रमुख अफगाणिस्तानातअफगाणिस्तानातील सरकार स्थापन करण्यासाठी तालिबान वेगानं प्रयत्न करत आहे. यातच पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचे प्रमुख देखील अफगाणिस्तानच्या दौऱ्यावर गेल्याची माहिती समोर आली आहे. यातच अफगाणिस्तानातील परिस्थिती अजूनही स्थिर नसून यावर इतक्यात काही भूमिका किंवा प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही, असा पवित्रा भारत सरकारनं घेतला आहे. तेथील परिस्थिती स्थिर होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय आता भारतासमोर राहिलेला नाही.
"सोशल मीडियात येणारे व्हिडिओ आणि बातम्या पाहता हे स्पष्ट दिसून येतं की हा तोच जुना तालिबान आहे. त्यांच्यात कोणताही बदल वगैरे झालेला नाही. त्यांना फक्त शत्रुंची शिकार करणं माहित आहे आणि ते लोकांना मारत सुटले आहेत. महिलांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला जात आहे", असं डगलस म्हणाले.
"भारतासाठी चिंता करण्याचं कारण नक्कीच आहे. विविध जिहादी गट आणि तालिबानचं समर्थन करण्याची पाकिस्तानची निती भारताविरोधात षडयंत्र रचण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील शत्रुत्व पाहूनच तयार झाली आहे हे स्पष्ट दिसून येतं", असंही ते म्हणाले.