अफगानिस्तानवर (Afghanistan) कब्जा मिळवल्यानंतर तालिबानच्या (Taliban) आता सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. तालिबानकडून अंतरिम संरक्षण मंत्री आणि गृहमंत्र्याची नियुक्ती करण्यात आली आहे. तालिबाननं खतरनाक दहशतवादी मुल्ला अब्दुल कय्यूम झाकिर (Mullah Abdul Qayyum Zakir) याला अफगाणिस्तानाचा अंतरिम संरक्षण मंत्री म्हणून नियुक्त केलं आहे. कतारच्या अल जजीरा वृत्तसंस्थेनं तालिबानी सुत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे.
मुल्ला अब्दुल कय्यूम झाकिर तालिबानचा कमांडर राहिलेला आहे. तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर याचा अत्यंत जवळचा सहकारी आहे. रॉयटर्सच्या माहितीनुसार अमेरिकन सैन्यानं मुल्ला अब्दुल याला २००१ साली अटक केली होती. त्यानंतर २००७ पर्यंत त्याला ग्वांतनामे बे या अमेरिकेचं शासन असलेल्या टॉप सिक्युरिटी तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर अफगाणिस्तान सरकारकडे त्याला सोपविण्यात आलं होतं. क्यूबामध्ये ग्वांटानामो खाडी क्षेत्रात अमेरिकेन सैन्याचं एक हाय सिक्युरिटी तुरुंग आहे. या तुरुंगात हाय प्रोफाइल दहशतवाद्यांना ठेवण्यात येतं.
काबुलवर तालिबाननं कब्जा मिळल्यानंतर आता १० दिवस उलटून गेले आहेत. अद्याप तालिबानला अफगाणिस्तानवर सरकार स्थापन करता आलेलं नाही. पण सरकार स्थापनेच्या दृष्टीकोनातून काही मंत्र्यांची नियुक्ती करण्यास तालिबाननं सुरुवात केली आहे. हाजी मोहम्मद इदरिस याची अफगाणिस्तानच्या सेंट्रल बँक द अफगाणिस्तान बँकेचा कार्यकारी प्रमुख म्हणून नियुक्त केलं आहे. तालिबानी प्रवक्ता जबीउल्ला मुजाहिद यानंही याबाबतची पुष्टी दिली आहे.
अफगाणिस्तानची वृत्तसंस्था पाझवोकनं दिलेल्या माहितीनुसार तालिबाननं गुल आगा याला काळजीवाहू अर्थमंत्री आणि सदर इब्राहिम याला काळजीवाहू अंतर्गत सुरक्षा मंत्री म्हणून नियुक्त केलं आहे. दरम्यान, तालिबान्यांची सत्ता येताच सरकारशी निगडीत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तान सोडलं आहे. तर काही अधिकारी अज्ञातवासात गेले आहेत. अशा परिस्थितीत तालिबान अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी तज्ज्ञ अधिकाऱ्यांना कामावर परतण्यासाठी तालिबानकडून प्रयत्न केले जात आहेत.