काबुल:अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. यातच आंतरराष्ट्रीय स्तरावर तालिबान सरकारला समर्थन मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. अफगाणिस्तानमधील क्रिकेटविषयी भीती कायम आहे. देशावर तालिबान्यांच्या ताबा घेतल्यानंतर तेथील लोकांचं जीवन बदललं आहे आणि क्रिकेटपटूंची परिस्थिती काही वेगळी नाही. अशातच आता तालिबानने अफगाणिस्तानच्या क्रिकेट संधाला पाठिंबा दर्शवला असून, क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नसल्याचे म्हटले आहे. (taliban assured to support afghanistan cricket team after meeting with cricketers)
“शेजारी राष्ट्रामधील अस्थिरता CAA ची गरज अधोरेखित करते”; केंद्रीय मंत्र्यांचे स्पष्ट मत
तालिबानच्या राजकीय छावणीशी संबंधित असलेल्या अनस हक्कानी या नेत्याने अफगाणिस्तान संघाचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अधिकारी असदुल्ला आणि नूर अली झाद्रान यांची भेट घेतली. यादरम्यान हक्कानी म्हणाले की, १९९६ ते २००१ या काळात त्यांच्या कारकिर्दीत देशात क्रिकेट सुरू झाले होते आणि भविष्यातही ते या खेळासाठी देशाला पाठिंबा देत राहतील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली आहे.
क्रिकेट आणि खेळाडूंच्या समस्या सोडवणार
अफगाणिस्तान क्रिकेट संघ आणि खेळाडूंच्या समस्या सोडवण्यासाठी तालिबान त्वरित कारवाई करेल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. खेळाडूंनी हक्कानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आणि तालिबान क्रिकेटला कायम पाठिंबा देईल, अशी आशा व्यक्त केली. अलीकडेच तालिबान्यांनी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या काबूलमधील कार्यालयात प्रवेश केल्याच्या बातम्या आणि फोटो समोर आले होते. तेव्हा काही क्रिकेटपटूही त्यांच्यासोबत होते.
तालिबानने भारतातून होणारी आयात-निर्यात रोखली; अफगाणिस्तानातील सत्तांतरानंतर निर्णय
दरम्यान, अफगाणिस्तानच्या संघाला पुढील महिन्यात पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेचे नियोजन अफगाणिस्तानला करायचे होते, मात्र अफगाणिस्तानातील परिस्थिती झपाट्याने बदलली. ही मालिका आयोजित करण्यासाठी श्रीलंकेची निवड केली होती. परंतु, तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यानंतर सर्व उड्डाणांवर बंदी घालण्यात आली. अफगाणिस्तान संघाच्या श्रीलंकेत आगमनाबाबत संभ्रमाची परिस्थिती आहे.