गजनी : अफगाणिस्तानात तालिबान दहशतवाद्यांनी कारागृहावर हल्ला करून सोमवारी शेकडो कैद्यांची सुटका करून घेतली. या हल्ल्यात चार पोलिसांचा मृत्यू झाला. दहशतवादी लष्करी गणवेशात आले होते. गजनी शहरातील या हल्ल्यामुळे कंदहार प्रांतातील २०११च्या अशाच एका हल्ल्याच्या कटू आठवणी जाग्या झाल्या. त्या हल्ल्यात ५०० तालिबान कैदी तुरुंगातून पसार झाले होते. गजनी शहरातील हल्ल्यानंतर कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न झालेले मृतदेह आढळून आले. अफगाण सुरक्षा दले नाटो सैनिकांच्या पूर्ण मदतीशिवाय तालिबानचा मुकाबला करत असताना हा हल्ला झाला. सहा तालिबान दहशतवाद्यांनी रात्री अडीच वाजता गजनी कारागृहावर हल्ला केला. आधी त्यांनी तुरुंगाच्या प्रवेशद्वाराजवळ कारबॉम्बचा स्फोट घडवून आणला व त्यानंतर कारागृहावर रॉकेट लाँचरचा मारा करत ते कारागृहात घुसले. या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने घेतली आहे. तालिबानचा प्रवक्ता जबीउल्ला मुजाहिद याने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘रात्री दोन वाजता हा हल्ला करण्यात आला. कारागृह तालिबानच्या ताब्यात आहे. या हल्ल्याद्वारे ४०० जणांची सुटका करून त्यांना मुजाहिद्दीनच्या नियंत्रणा खालील भागात नेण्यात आले आहे’. चार तुरुंगरक्षक मृत्युमुखी, ७ जखमीकारागृहातील ४३६ पैकी ३५५ कैदी फरार झाले. यातील बहुतांश कैद्यांविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा आणि इतर गुन्ह्यांबाबत गुन्हे दाखल होते. हल्ल्यात चार तुरुंगरक्षक मृत्युमुखी पडले, तर सात जखमी झाले, असे उपगव्हर्नर मोहंमद अली अहमदी यांनी सांगितले. दरम्यान, हल्ला सुरू होताच कारागृहातील काही खतरनाक कैद्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
तालिबानचा हल्ला; ३५५ कैदी फरार
By admin | Published: September 15, 2015 3:03 AM