काबूल : अमेरिकी फौजा माघारी फिरताच तालिबान बंडखोरांनी सुरक्षा दलाविरुद्ध लढा तीव्र केला असून गेल्या आठवडाभरात तालिबानांच्या हल्ल्यात सुरक्षा कर्मचाऱ्यांसह १०० नागरिक ठार झाले आहेत. यापैकी १२ जणांचा त्यांनी शिरच्छेद केला. शुक्रवारीही सुरक्षा दल आणि तालिबानदरम्यान चकमकी झडल्याचे गझनीचे उप-पोलीस प्रमुख असदऊल्ला इन्साफी यांनी सांगितले.तालिबानांनी पूर्वेकडील गझनी प्रातांतील अर्जिस्तान जिल्ह्याला लक्ष्य करून भीषण हल्ले केले. सरकारकडून वेळीच मदत मिळाली नाही, तर हा जिल्हा तालिबानच्या कब्जात जाण्याची शक्यता आहे. याच जिल्ह्यातील चार गावांतील १२ जणांचा शिरच्छेद करून अमानुषपणाचा कळस गाठला. तालिबानांच्या हल्ल्यात गेल्या आठवडाभरात ८० ते १०० जण ठार झाल्याचा अंदाज आहे, असे गझनीचे उपराज्यपाल मोहंमद अली अहमदी यांनी सांगितले. सुरक्षा दल आणि तालिबान बंडखोरांदरम्यानच्या तुंबळ धुमश्चक्रीमुळे या जिल्ह्यातील स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. तालिबानांनी ६० ते ७० घरे जाळली. सरकारने कुमक पाठविल्याचे आम्हाला कळविले आहे, असे अहमदी यांनी सांगितले.अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्शफ घनी विजयीअफगाणिस्ताच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अर्शफ घनी विजयी झाल्याची अधिकृत घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे आरोप करण्यात आल्याने हिंसाचार भडकण्याची शक्यता होती. त्यामुळे निकाल जाहीर करण्यात आला नव्हता. (वृत्तसंस्था)
तालिबानच्या हल्ल्यात १०० अफगाणी ठार
By admin | Published: September 27, 2014 7:00 AM