कुंडूझ (अफगाणिस्तान) : तालिबान अतिरेक्यांनी कुंडूझ या उत्तरेकडील प्रांतातील पोलिसांच्या तळावर शनिवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात १९ अफगाण पोलीस ठार झाले. विशेष म्हणजे, अतिरेक्यांनी काही तासांपूर्वीच पुढील आठवड्यापासून शस्त्रसंधी जाहीर केली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.हा हल्ला आम्ही केल्याचा दावा तालिबान्यांनी केला आहे. पश्चिमेकडील हेरात प्रांतातील लष्करीतळावर आदल्याच दिवशी बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात १७ अफगाण सैनिक ठार झाले होते. कुंडूझ प्रांताच्या गव्हर्नरांचे प्रवक्ते नेहमतुल्ला तैमुरी म्हणाले की, शनिवारी ‘काल-ए-झाल’ जिल्ह्यातील पोलीसतळावर झालेल्या या हल्ल्यात पाच स्थानिक पोलीस जखमी झाले आहेत. प्रांतीय पोलिसांचे प्रवक्ते ई. रहमानी यांनी १९ जण ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला व या चकमकीत आठ तालिबानी ठार झाल्याचे सांगितले. रमझान ईदच्या पहिल्या तीन दिवसांसाठी आम्ही अफगाणच्या सुरक्षादलांशी शस्त्रसंधी करीत असल्याचे तालिबान्यांनी जाहीर करण्याच्या काही तास आधी हे दोन हल्ले केले गेले. तालिबान्यांविरोधात अफगाण सरकारनेच अनपेक्षितपणे एक आठवड्याची शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर तालिबान्यांकडूनही अनपेक्षित अशी शस्त्रसंधीची घोषणा दोन दिवसांनंतर झाली. (वृत्तसंस्था)
तालिबान्यांचा पोलीसतळावर हल्ला, १९ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 5:03 AM