Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातून अमेरिकेनं आपलं सैन्य पूर्णपणे मागे घेतल्यानंतर तालिबाननं आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी रात्री काबुल विमानतळावरुन अमेरिकन सैन्याचं अखेरचं विमान मायदेशी रवाना झालं आणि त्याचवेळी तालिबान्यांनी पंजशीरवर हल्लाबोल केला. पण यातही तालिबानला यश आलेलं नाही.
तालिबानच्या विरोधात लढा देणाऱ्या नॉदर्न अलायन्सनं केलेल्या दाव्यानुसार सोमवारी रात्री तालिबानी दहशतवाद्यांनी पंजशीर खोऱ्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही बाजूनं गोळीबार झाला आणि यात तालिबानचे ७ ते ८ जण ठार झाले आहेत. तर नॉदर्न अलायन्सच्या दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
अफगाणिस्तानतील बहुतांश प्रांतावर तालिबाननं कब्जा मिळवलेला आहे. पण पंजशीरवर कब्जा करणं तालिबान्यांना अद्याप जमलेलं नाही. अहमद मसूदच्या नेतृत्त्वाखाली नॉदर्न अलायन्सनं तालिबान्यांविरोधात युद्ध पुकारलं आहे. शेर-ए-पंजशीर अहमद शाह मसूदचा मुलगा अहमद मसूद आणि अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी एकत्र येत तालिबान विरोधात मोठी आघाडी उघडली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तालिबाननं याठिकाणी अनेकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आलेलं नाही. याआधी तब्बल ३०० तालिबानी दहशतवादी मारले गेल्याचा दावाही नॉदर्न अलायन्सनं केला होता.
दरम्यान, दोन्ही बाजूंकडून चर्चा देखील सुरू असल्याचं कळतं. पंजशीरमधील लोकांशी आमचे संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं तालिबाननं सांगितलं होतं. तर नॉदर्न अलायन्सच्या अहमद मसूदनंही तालिबानसोबत चर्चेसाठी तयार असल्याचं म्हटलं होतं. सरकार स्थापनेच्या चर्चेसाठी आम्ही तयार आहोत. पण जर तालिबानला युद्धच हवं असेल तर त्यासाठीही आम्ही तयार आहोत, असं अहमद मसूदनं म्हटलं होतं.
अमेरिकन सैन्याची अफगाणिस्तानातून पूर्णपणे माघारअमेरिकन सैन्याचं शेवटचं विमान काबुल विमानतळावरुन सोमवारी रात्री मायदेशी परतण्यासाठी रवाना झालं. यासोबतच अमेरिकेचं अफगाणिस्तानमधील गेल्या २० वर्षांपासून वास्तव्य संपुष्टात आलं आहे. आता काबुल विमानतळावरही तालिबानचं साम्राज्य आहे. तालिबान्यांनी हवेत गोळीबार करत काबुल विमानतळावर मिळवलेल्या नियंत्रणाचं सेलिब्रेशन देखील केली. लवकरच देशातील परिस्थिती शांत होईल असाही दावा तालिबाननं केला आहे. सर्व अफगाणी नागरिकांना तालिबान्यांनी कामावर परतण्याचं आवाहन केलं आहे.