ऑनलाइन लोकमतकाबूल, दि. 25 - अफगाणिस्तानातील हेरात प्रांतात शनिवारी रात्री सलमा डॅमवर तालिबान्यांनी हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात 10 पोलीस शहीद झाले आहेत. अफगाणिस्ताननं सलमा डॅम हा भारताच्या सहकार्यानं बनवला आहे. या डॅमचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षी जून महिन्यात केलं होतं. या हल्ल्यात 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. स्थानिक मीडियाच्या रिपोर्ट्नुसार, तालिबान्यांनी केलेल्या या दहशतवादी हल्ल्यात 10 पोलीस शहीद झाले आहेत. तसेच या हल्ल्यात 4 गंभीर स्वरूपात जखमी आहेत. तालिबानी दहशतवाद्यांनी हेरात प्रांतातील चश्ता जिल्ह्यात एका तपासणी नाक्यावर हल्ला केल्यानंतर सलमा डॅमला लक्ष्य केलं आहे.
तर गेल्या काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानमधील हेमलंड प्रांताची राजधानी लष्कर गाह येथे भीषण स्फोट झाला. एका कारमध्ये हा स्फोट घडवण्यात आला होता, स्फोटात 24 जणांचा मृत्यू झाला. त्यावेळी झालेल्या हल्ल्यात 60 जण जखमी झाले असून, मृतांचा आकडा वाढू शकतो. अफगाणिस्तान गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ल्यांना बळी पडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजता हा स्फोट झाला होता.
हेमलंड प्रांताचे प्रवक्ता उमर ज्वाक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ""24 हून जास्त जणांचा मृत्यू झाला असून, 60 हून अधिक जखमी आहेत. जखमी आणि मृतांमध्ये पोलीस, लष्कर, स्थानिक आणि न्यू काबूल ब्रांचच्या कर्मचा-यांचा समावेश आहे.""
टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, स्फोट झाला तेव्हा लोक एका बँकेबाहेर आपला पगार घेण्यासाठी जमा झाले होते. स्फोटानंतर जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात भर्ती करण्यात आलं होतं.