तालिबाननेअफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केला. राजधानी काबुल ताब्यात घेतल्यानंतर तालिबानींनी संसद, राष्ट्रपती भवनावर कब्जा केला. तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर संपूर्ण जगात खळबळ माजली होती. त्यानंतर आता अफगाणिस्तामध्ये महिलांना दैनंदिन जीवनात अनेक बंधनांचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. तालिबानने नवीन फर्मान काढलं आहे. अफगाणिस्तानमध्ये ज्या महिलांना लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल त्यांच्यासोबत पुरुष नातेवाईक असणं आवश्यक आहे. जर सोबत पुरुष नातेवाईक नसेल तर या महिलांना प्रवास करता येणार नाही, असं तालिबानी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
तालिबानने कारमध्ये म्युझिक वाजवण्यावरही बंदी घातली आहे. प्रवासादरम्यान महिलांना हिजाब घालावा लागेल, असंही तालिबानने म्हटलं आहे. तसेच मुलींच्या शिक्षणावर देखील त्यांनी यापूर्वीच अनेक निर्बंध लादले आहेत. तालिबानच्या नव्या आदेशामध्ये "70 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या महिलांना त्यांच्या कुटुंबातील जवळचा सदस्य नसल्यास त्यांना प्रवास करू देऊ नये. ज्यांना प्रवास करायचा आहे, त्यांच्यासोबत पुरुष नातेवाईक असणं आवश्यक आहे" असं मंत्रालयाचे प्रवक्ते सादिक अकीफ मुहाजिर यांनी सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
तालिबानने याआधी संपूर्ण देशात को-एज्युकेशन म्हणजेच एकाच शाळेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शिकवण्यास मज्जाव करण्यात आला. यासोबतच यापुढे पुरूष शिक्षक विद्यार्थिनींना शिकवू शकत नाहीत, असं फर्मान जारी केलं होतं. अफगाणिस्तानचे उच्च शिक्षण मंत्री शेख अब्दुल बाकी हक्कानी यांनी याबाबतची घोषणा केली होती. अफगाणिस्तानच्या नागरिकांनी आपल्या धार्मिक आणि राष्ट्रीय मूल्यांचं रक्षण करण्यासाठी सक्षम असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं. यात युवांनी मोठी जबाबदारी पार पाडली आहे.
देशातील शिक्षक आणि तज्ज्ञांची जबाबदारी आहे की त्यांनी देशाच्या निर्माणात आपली मोलाची भूमिका पार पाडावी, असं शेख अब्दुल हक्कानी यांनी म्हटलं होतं. देशात लवकरच इस्लामिक मूल्यांचं पालन करुन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी वेगवेगळ्या शिक्षण संस्था सुरू करण्यात येतील, असंही हक्कानी यांनी जाहीर केलं होतं. देशाची राजकीय व्यवस्था अफगाणिस्तानच्या शिक्षण संस्थेला मजबूत करण्यासाठी काम करेल, असंही ते म्हणाले होते.