अफगाणिस्तानची राजधानी काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबान नवीन सरकार बनविण्याच्या तयारीत आहे. मात्र, अद्यापही अनेक जिल्ह्यांत तालिबानीदहशतवादी आणि अफगाणिस्तानी सैन्य समोरासमोर आहे. अफगाणिस्तानच्या बागलाण प्रांतातील अंद्राबमध्ये तालिबान आणि विरोधकांमध्ये भीषण लढाई सुरू आहे. अफगाणिस्तानच्या लष्कराने बानू जिल्ह्यात तालिबानचे कंबरडे मोडले आहे. तालिबानच्या जिल्हा प्रमुखांसह 50 तालिबानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. याशिवाय जवळपास 20 तालिबानी दहशतवाद्यांना बंदीही बनवण्यात आले आहे.
पंजशीर प्रांताने केलेल्या एका ट्विटनुसार, तालिबानचा बानू जिल्हा प्रमुख मारला गेला आहे. त्याचे तीन साथीदारही ठार झाले आहेत. अंद्राबच्या वेगवेगळ्या भागात दोन गटांमध्ये सातत्याने संघर्ष सुरू आहे. फज परिसरात 50 तालिबानी दहशतवादी मारले गेले आहेत. तर 20 जणांना कैद करण्यात आले आहे. यापूर्वी, अफगाण सैन्याने बागलाण प्रांतात 300 तालिबानी दहशतवादी मारले होते. बीबीसीच्या वरिष्ठ पत्रकार याल्दा हकीम यांनी बागलाणच्या अंद्राबमध्ये लपून तालिबानींवर केलेला हा मोठा हल्ला असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात तालिबानचे मोठे नुकसान झाले. तसेच, तालिबानविरोधी मंडळींनी दावा केला होता, की या हल्ल्यात त्यांनी 300 वर तालिबीनी लोकांना ठार केले आहे.
तालिबानने अफगाणिस्तानच्या 34 पैकी 33 प्रांतांवर कब्जा केला आहे. 15 ऑगस्टला त्यांनी राजधानी काबूलवरही कब्जा केला. काबुलवर ताबा मिळविल्यानंतर त्यांनी लवकरच सरकार स्थापन करण्यात येईल, असा दावा केला होता. मात्र, अद्याप पंजशीरच तालिबान्यांच्या हाती आलेला नाही.
पंजशीर काबीज करण्याच्या तयारीत असलेल्या तालिबानला अमरुल्ला सालेह आणि अहमद मसूद यांच्यासोबत कडवा संघर्ष करावा लगत आहे. रविवारी एका मुलाखतीत अहमद मसूद म्हणाला होता, की ते लढणार नाही, पण कुठल्याही प्रकारच्या आक्रमाचा प्रतिकार करतील. तसेच, तालिबानसोबतची चर्चा यशस्वी ठरली नाही, तर युद्ध टाळले जाऊ शकत नाही.