तालिबाननेअफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केला. अफगाणिस्तानमध्ये सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जीव वाचवण्यासाठी नागरिक धावपळ करत आहेत. तालिबान कशाप्रकारे अफगाणिस्तानातील महिला आणि मुलांना त्रास देतंय याचं हृदयद्रावक चित्र पाहायला मिळत आहे. तसेच लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान आणखी एक भयंकर घटना समोर आली आहे. तालिबानींचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तान ज्युनिअर महिला राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघाच्या खेळाडूचा शिरच्छेद केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पर्सियन इंडिपेंडेंट वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, एका कोचने याबाबत माहिती दिली. महजबीन हकिमी नावाच्या खेळाडूची ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला तालिबान्यांकडून गळा कापून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हत्येबाबत कोणालाही समजू नये म्हणून कुटुंबाला धमकावण्यात आलं होतं. यामुळे हत्येची माहिती तेव्हा समोर आली नव्हती. महजबीन ही अफगाणिस्तानात सत्तांतर होऊन तालिबान्यांची सत्ता येण्याआधी काबुल नगरपालिका व्हॉलीबॉल क्लबसाठी खेळत होती. महजबीन संघाच्या स्टार खेळाडूंपैकी एक होती.
महजबीनच्या मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
काही दिवसांपूर्वी शिरच्छेद केलेल्या महजबीनच्या मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये तिचं डोकं आणि मान रक्तबंबाळ दिसत होती. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या कोचने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात तालिबानने देशातील सत्ता हातात घेण्याआधी फक्त दोनच खेळाडू देशातून पलायन करू शकले. मागे राहिल्या अनेक दुर्दैवी खेळाडूंमध्ये महजबीनचा देखील समावेश होता. व्हॉलीबॉल संघाच्या सर्व खेळाडू आणि इतर महिला खेळाडू सध्या वाईट परिस्थितीत असून भीतीच्या वातावरणात आहेत असं त्यांनी सांगितलं आहे.
महजबीनच्या हत्येमुळे पुन्हा एकदा भीतीचं वातावरण
"तालिबानी सत्ता मिळवल्यापासून महिला खेळाडूंची ओळख पटवत त्यांची हत्या करत आहेत. दहशतवादी खासकरुन महिला व्हॉलीबॉल संघाच्या खेळाडूंचा शोध घेत आहेत, ज्यांनी देशातील आणि विदेशातील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला होता. तसंच काही मीडिया कार्यक्रमांमध्येही सहभागी झाल्या होत्या" असा दावा कोचने केला आहे. 1978 मध्ये अफगाणिस्तानने महिला व्हॉलीबॉल टीम तयार केली आहे. देशातील अनेक तरुणींसाठी त्या आशेचा किरण आणि प्रेरणा होत्या. मात्र महजबीनच्या हत्येमुळे पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. गेल्या आठवड्यात फिफा आणि कतार सरकारने अफगाणिस्तानमधून 100 महिला फुटबॉल खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांना बाहेर काढलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.