काबूल:अफगाणिस्तान आता तालिबानच्या ताब्यात आहे. देश ताब्यात आल्यानंतर तालिबानी सैनिक घरोघरी जाऊन अफगाणी सैनिक आणि अधिकाऱ्यांचा शोध घेत आहेत. एका रिपोर्टनुसार, तालिबानी सैनिकांनी बुधवारी कंधार आणि हेरात येथील बंद असलेल्या भारतीय दूतावासातही पोहोचले. यावेळी त्यांनी दूतावासातील अनेक कागदपत्र तपासले. तसेच, दूतावासाबाहेर पार्क केलेल्या कार घेऊन गेले.
स्काय न्यूजच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, एनडीएस गुप्तचर संस्थेसाठी काम करणाऱ्या अफगाणी नागरिकांना ओळखण्यासाठी तालिबानचे लोक काबुलमध्ये घरोघरी शोध घेत आहेत. काबूलमधून आलेल्या अहवालांनुसार, दहशतवादी गटाचा प्रमुख आणि तालिबानचा उपनेता सिराजुद्दीन हक्कानी भाऊ अनस हक्कानीच्या नेतृत्वाखाली हक्कानी नेटवर्कच्या सुमारे 6,000 कार्यकर्त्यांनी काबूलचा ताबा घेतला असल्याचं मानलं जातं आहे.
त्याच्याच आदेशानुसारच दूतावासांवर छापे टाकले जात आहेत. दरम्यान, अनस हक्कानीने माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई, अध्यक्ष एचसीएनआर अब्दुल्ला अब्दुल्ला आणि हिज्ब-ए-इस्लामीचे ज्येष्ठ गुलबुद्दीन हेटकमत्यार यांचीही भेट घेतली. असेही मानले जात आहे की, करझाई आणि अब्दुल्ला या दोघांच्या हालचाली तालिबान्यांद्वारे प्रतिबंधित आणि नियंत्रित केल्या जात आहेत. करझई आणि अब्दुल्ला दोघंही राष्ट्रपती भवनात तालिबान नेता मुल्ला अब्दुल गनी बरदार याच्याकडे औपचारिकपणे सत्ता सोपवण्यासाठी चर्चा करत आहेत. सिराजुद्दीन हक्कानी पाकस्तानातील क्वेट्टा येथून सूचना देत असल्याचंही सांगितलं जात आहे.