काबुल:अफगाणिस्तानातील काबुल विमानतळाबाहेर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला अमेरिकेनं ड्रोन हल्ल्याद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पण, देशात अजूनही भीतीचे वातावरण आहे. यातच आता अमेरिका आणि इतर सैन्यानं काबुल विमानतळाच्या 3 गेटचं पूर्ण नियंत्रण तालिबानच्या ताब्यात दिल्याची माहती समोर आली आहे.
स्पेशल फोर्स युनिट तैनात
अमेरिकन सैन्याच्या नियंत्रणात आता फक्त विमानतळाचा एक छोटासा भाग आहे. त्यात विमानतळाची रडार यंत्रणा आहे. इतर भाग आता तालिबानच्या ताब्यात असून, तेथील सुरक्षाही त्यांच्या हाती देण्यात आली आहे. दोन आठवड्यांपूर्वी तालिबाननं विमानतळाच्या मुख्य गेटवर विशेष दलाची एक तुकडी तैनात केली होती. हीच तुकडी आता विमातळाच्या तिन्ही गेटची सुरक्षा आपल्या हाती घेईल, अशी माहिती इनहमुल्लाह समंगानी नावाच्या एका अधिकाऱ्यानं रविवारी दिली.
26 ऑगस्ट रोजी हल्ला झाला होता
अमेरिकेनं विमानतळाच्या गेटचं नियंत्रण तालिबानकडं अशावेळी सोपवलं आहे, जेव्हा ISIS-K या दहशतवाती संघटनेनं 26 ऑगस्ट रोजी विमानतळाबाहेर आत्मघाती हल्ला केला होता. त्या हल्ल्यात 170 अफगाण आणि 13 अमेरिकन सैनिक ठार झाले होते. त्यापूर्वी, तालिबानच्या एका अधिकाऱ्यानं विमानतळाची सुरक्षा हाती घेण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं. आता तालिबानच्या हातात काबुल विमानतळाचा मोठा भाग आल्यामुळे भविष्यात तेथील परिस्थिती कशी होईल, हे येणारा काळच सांगेल.