Afghanistan Crises: तालिबाननं आता पंजशीर खोऱ्यातही कब्जा केला आहे. याबाबतची माहिती समोर येताच तालिबानच्या दहशतवाद्यांनी काबुल विमानतळावर हवेत गोळीबार करत जोरदार सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनमध्ये झालेल्या गोळीबारात काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पंजशीर खोऱ्यात तालिबान आणि नॉदर्न अलायन्स यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार संघर्ष सुरू होता. संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबाननं मिळावला असला तरी पंजशीर खोऱ्यात तालिबानला नियंत्रण मिळवता आलेलं नव्हतं. अखेर काल रात्री पंजशीर खोऱ्यावर नियंत्रण मिळाल्याची माहिती मिळताच काबुल विमानतळावरील तालिबान्यांनी जोरदार सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली. अफगाणिस्तानतील स्थानिक पत्रकार जियार खान यांनीही काबुलमधील तालिबान्यांच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ( Taliban claimed possession of Panjshir Heavy celebratory shots fired in Kabul children killed)
स्थानिक अफगाण वृत्तसंस्था असवाकाच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री तालिबान्यांकडून केल्या गेलेल्या सेलिब्रेशनमध्ये हवेत गोळीबाराच्या घटनेत काबुलमध्ये लहान मुलांसह काही लोक मारले गेले आहेत. काबुलमध्ये शुक्रवारी रात्री जोरदार गोळीबाराचा आवाज ऐकू येत होता. तालिबाननं पंजशीर खोऱ्यावर नियंत्रण मिळवल्याची घोषणा केली होती. नॉदर्न अलायन्सचा पराभव केल्याची घोषणा तालिबानकडून करण्यात आली आहे. याचच सेलिब्रेशन करताना तालिबान्यांनी हवेत गोळीबार करण्यास सुरुवात केली आणि त्यांना कशाचच भान नव्हतं. यात निष्पाप लहान मुलांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. जखमी नागरिकांचे नातेवाईक जखमींना रुग्णालयात घेऊन जातानाचे व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
तालिबानच्या एका कमांडरनं पंजशीर खोऱ्यावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे. अल्लाहच्या कृपेनं आता संपूर्ण तालिबानवर आमचं नियंत्रण आहे. नॉदर्न अलायन्सचा पराभव झाला आहे आणि पंजशीर देखील आमच्या नियंत्रणाखाली आहे, अशी माहिती तालिबानी कमांडरनं रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिली आहे.