अफगाणिस्तानच्या पंजशीर प्रांत सोडून संपूर्ण देशावर तालिबानने ताबा केला आहे. या प्रांतात अहमद मसूदची एनआरएफ सेना तालिबानसोबत लढत आहे. माजी उप-राष्ट्रपती अमरूल्लाह सालेह हेही एनआरएफसोबत आहेत आणि ते पंजशीरमधेच थांबले आहेत. अशात आता अशी माहिती समोर आली आहे की, तालिबानचे सैनिक त्या घरापर्यंत पोहोचले आहेत जिथे सालेह राहत होते. पाकिस्तानच्या एका पत्रकाराने या घराचा व्हिडीओ शेअर केला. ज्यात सांगण्यात आलं आहे की, तालिबान्यांना सालेह यांच्या घरात डॉलर आणि किंमती वस्तू मिळाल्या आहेत.
मीडिया रिपोर्ट्समध्ये तालिबान्यांच्या हवाल्याने सांगण्यात आलं की, सालेह यांच्या घरी त्यांना ६.५ मिलियन डॉलर(४८ कोटी रूपये) सापडले. तालिबान्यांनी सांगितलं की, त्यांना सालेह यांच्या घरात सोन्याच्या वीटा आणि इतरही किंमती वस्तू सापडल्या. सोबतच असाही दावा केला की, त्यांना जी रक्कम सापडली ती केवळ एक छोटासा भाग आहे. व्हायरल व्हिडीओत तालिबान्यांच्या हातात डॉलरचे बंडल आहेत. बाजूला सोन्याच्या वीटाही आहेत.
जर तालिबानचा हा दावा खरा असेल तर याने पंजशीरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला झटका बसू शकतो. अशरफ गनी पळून गेल्यानंतर स्वत:ला देशाचे कार्यवाहक राष्ट्रपती घोषित करणारे सालेह यांची इमेज स्वच्छ मानली जाते. याआधी तालिबान्यांनी काही दिवसांपूर्वी एक फोटो जारी केला होता, ज्यात एक दहशतवादी हातात बंदुक घेऊन त्या लायब्ररीत बसला होता जिथे काही दिवसांपूर्वी अमरूल्लाह सालेह यांनी एक व्हिडीओ बनवून जारी केला होता.
तालिबानने अमरूल्लाह सालेह यांचे भाऊ रोहुल्ला सालेह यांचीही हत्या केली आहे. ते एनआरएफच्या एका यूनिटचे कमांडर होते. असं सांगितलं जात आहे की, तालिबानने रोहुल्लाचा मृतदेह ठिकपणे दफनही करू दिला नाही. सालेह परिवाराचे सदस्य इबादुल्लाह सालेह यांनी सांगितलं की, तालिबानने त्यांच्या काकाची हत्या केली. तालिबानने मृतदेहही दफन करू दिला नाही आणि म्हणत आहे की, मृतदेह असाच सडला पाहिजे.