वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे सुरक्षा सल्लागार राहिलेल्या जॉन बोल्टन (John Bolton) यांनी मोठी भीती व्यक्त केली आहे. अमेरिक सैनिकांच्या माघारीनंतर तालिबानपाकिस्तानच्या 150 अणुबॉम्बवर कब्जा करण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. जर तालिबानने (Taliban) पाकिस्तानवर (Pakistan) हल्ला केला आणि ताबा मिळविला तर हे आण्विक शस्त्रास्त्रे तालिबानच्या हाती लागू शकतात. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यावर आता पाकिस्तानवरही त्यांच्या हल्ल्याची टांगती तलवार आहे. (Former security advisor John Bolton warned Taliban could get nuclear weapons. )
तालिबानने आता अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळविले आहे. त्यांचे दहशतवादी आता पाकिस्तानवर कब्जा करण्याचा धोका वाढला आहे. याचा अर्थ 150 अणुबॉम्ब दहशतवाद्यांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. सध्या तालिबानच्या ताब्यात अमेरिकेने अफगाणिस्तान सैन्याला दिलेली अब्जावधींची अत्याधुनिक शस्त्रे आहेत. हीच आता तालिबानची ताकद ठरणार असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
तालिबानी दहशतवाद्यांचा पाकिस्तानवर हल्ला करण्याचा धोका वाढू लागला आहे. पाकिस्तानकडे 150 ते 160 अणुबॉम्ब आहेत. याशिवाय जमीनीवरून मारा करू शकणारी 102 मिसाईल आहेत. पाकिस्तानने अमेरिकेकडून घेतलेल्या एफ-16 लढाऊ विमानांवर 24 अणुबॉम्ब लाँचर आहेत. या साऱ्याचा ताबा जर तालिबानला मिळाला तर त्याचा धोका जगाला असल्याचे जॉन बोल्टन यांनी म्हटले आहे. बोल्टन हे एप्रिल 2018 ते सप्टेंबर 2019 पर्यंत ट्रम्प यांचे सुरक्षा सल्लागार राहिलेले आहेत.
बोल्टन यांचे हे वक्तव्य अशावेळी आले आहे, जेव्हा पाकिस्तानच्या मदरशांवर तालिबानी झेंडे फडकविले जात आहेत. पाकिस्तानाच देखील शरीया कायदा लागू करण्याची मागणी होऊ लागली आहे. तसेच हे झेंडे काढण्यास गेलेल्या पोलिसांना मौलाना आणि लोकांकडून विरोध झाला आहे. पाकिस्तानमध्ये आता तालिबानी विचार पसरू लागल्याने जगासमोर धोका निर्माण झाला आहे.