काबूल : तालिबानच्या दहशतीमुळे हजारो नागरिक अफगाणिस्तानातून पलायन करत आहेत. काबूलच्या विमानतळावर प्रचंड गर्दी झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशाबाहेर जाणाऱ्यांची गर्दी पांगविण्यासाठी तालिबानी बंडखोरांनी हवेत गोळीबार केला. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्यू झाला. यात १२ ते १५ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र, याला दुजोरा मिळू शकला नाही. याबाबत ब्रिटिश लष्कराने सांगितले, की येथील गंभीर स्थिती नियंत्रणात यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
अफगाणिस्तानात २० वर्षांनंतर तालिबानने सत्ता काबीज केली. मात्र, अफगाण नागरिकांमध्ये आजही तालिबानी राजवटीतील कटू स्मृती कायम आहेत. त्यामुळे भीतीने हजारो नागरिक देश सोडून जात आहेत. काबूल विमानतळ सध्या अमेरिका व नाटोच्या सैनिकांच्या सुरक्षेमध्ये सुरू आहे. ब्रिटनने सुमारे ४ हजार नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. अमेरिकेसमोर ३१ ऑगस्टपर्यंत येथून संपूर्ण माघारीचे आव्हान आहे. ही मुदत पाळणे अतिशय कठीण असून, काही दिवसांची मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांनी व्यक्त केली आहे.
विमानतळाच्या भिंतींवर तारेचे कुंपण आहे. लहान मुलांसह महिला आत शिरण्याचा प्रयत्न करतानाचे व्हिडीओ शेअर होत आहेत. त्यामुळे चढण्याची परवानगी असलेल्यांनाही विमानतळावर प्रवेश करणे अवघड झाले आहे. (वृत्तसंस्था)
नागरिकांवर ‘आयसीस’कडून हल्ल्याचा धोकाnअफगाणिस्तानातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अमेरिकेसमोर ‘आयसीस’चा धोका निर्माण होऊ पाहत आहे. अमेरिकन सरकारने सांगितल्याशिवाय अमेरिकन नागरिकाने काबूलमध्ये प्रवास करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. nया धोक्यामुळे अमेरिकेने नागरिकांना हलवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला. अमेरिकन व काही इतर ठरावीक नागरिकांना काही सूचना दिल्या जातील. हल्ल्याची शक्यता असल्याने अमेरिकन ट्रान्झिट कॅम्पमधून दुसरीकडे जाताना काय करावे, घोके कसे टाळावे, हे सांगितले जाईल.
अमेरिका खासगी विमानसेवेची मदत घेणार अफगाणिस्तानातील स्थिती पाहून बायडेन प्रशासनाकडून खासगी विमान वाहतूक कंपन्यांची मदत घेण्याबाबत विचार सुरू आहे. लष्करी विमानांनी बाहेर काढलेल्यांना नेण्यासाठी विमान कंपन्यांनी विमाने तसेच कर्मचाऱ्यांची मदत करावी, असा प्रस्ताव प्रशासन लवकरच देणार आहे. याबाबत विमान कंपन्यांना नोटीस पाठविली आहे. अमेरिकेसमोर ३१ ऑगस्टची डेडलाइन आहे. त्यामुळे निर्वासितांना लवकरात लवकर एअरलिफ्ट करण्याचे अमेरिकेचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.