काबुल: अमेरिकेनं अफगाणिस्तान सोडताच तालिबाननं काबुल विमानतळावर कब्जा करुन विमानतळच बंद केलंय. विमानतळ बंद केल्यानंतर देशातून बाहेर जाण्याच्या तयारीत असलेले हजारो-लाखो लोक अफगाणिस्तानच्या सीमेकडे धाव घेत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता हे लोक सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना काहीही करुन अफगाणिस्तानातून बाहेर पडायचं आहे.
अफगाणिस्तानातील नागरिक देश सोडण्यापूर्वी बँकातील आपले पैसे काढण्यासाठी बँकांबाहेर प्रचंड गर्दी करत आहेत. पण, त्यांना बँकांनी पैशांचे व्यवहार बंद केल्यामुळे नागरिकांना पैसेही मिळण्यात अडचणी येत आहेत. यावरुन तालिबानच्या येण्याने देशावर किती मोठं आर्थिक संकट आलंय, हे कळेल. दरम्यान, अफगाणिस्तानला मदत पाठवण्यासाठी काबुल विमानतळ हा एकमेव सुरक्षित मार्ग होता, पण आता हा बंद केल्यामुळे अफगाणी नागरिकांना मदत पाठवणेही अवघड झालं आहे.
इराणच्या सीमेला प्रचंड गर्दीतालिबाननं काबुल विमानतळ बंद केल्यामुळे अफगाणिस्तान आणि इराण दरम्यान असलेल्या इस्लाम काला बॉर्डर पोस्टवर मोठ्या संख्येनं अफगाणी नागरिक जमा होत आहेत. यापूर्वी, अमेरिकेनं काबुलमधून 123,000 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढलंय. पण, तरीही हजारो लोक इथेच अडकले आहेत.