काबूल - अमेरिकन सैन्याने काढता पाय घेतल्यानंतर जवळपास संपूर्ण देश ताब्यात घेणाऱ्या तालिबानने आता अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलवरही आक्रमण केले आहे. तालिबानच्या दहथवाद्यांनी काबूलमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त आले असून, आंततराष्ट्रीय वृत्तसंस्था एपीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एपीने प्रसारित केलेल्या वृत्तामध्ये एका अफगाण अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगण्यात आले की, तालिबानचे दहशतवादी काबूलच्या सीमेमध्ये घुसले आहेत. तसेच या दहशतवाद्यांनी सर्व बॉर्डर क्रॉसिंगवक कब्जा केला आहे. (Taliban have begun entering the Afghan capital Kabul from all sides, the Afghan interior ministry said on Sunday)
दरम्यान, तालिबानने सांगितले आहे की, आम्ही बळाच्या जोरावर काबूलवर कब्जा करू इच्छित नाही. तर आम्ही सत्ता परिवर्तनाच्या माध्यमातून सत्ता मिळवू इच्छित आहोत, अधिकाऱ्याने आपले नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सध्या तरी कुठल्याही प्रकारचा संघर्ष सीमेवर होत नाही आहे. तालिबानचे दहशतवादी काबूलमधील कलाकान, काराबाग आणि पगमान जिल्ह्यांमध्ये घुसले आहेत. याबाबत सरकारकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे. रविवारी कार्यालयांमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना लवकरच घरी पाठवण्यात आले.
तालिबान काबूलमध्ये घुसल्याच्या येत असलेल्या वृत्तादरम्यान, तालिबानकडूनही प्रतिक्रिया समोर आली आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, दहशतवाद्यांना काबूलमध्ये न घुसण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच आम्ही अफगाण सैन्य आणि सर्वसामान्यांवर बदल्याच्या भावनेने कारवाई करणार नसल्याचेही सांगितले आहे. तालिबान सर्वांना माफ करणार असल्याचे या प्रवक्त्याने सांगितले. तसेच लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.