काबूल:तालिबाननंअफगाणिस्तानमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. अफगाणिस्तानातील दुसऱ्या पत्रकार परिषदेत तालिबानचा प्रवक्ता झबीहुल्ला मुजाहिदनं पुढील योजना सांगितल्या आहेत. तो म्हणाला की, सरकार स्थापनेवर सध्या चर्चा सुरू आहे.
मुजाहिदनं सांगितल्यानुसार, काही सरकारी कार्यालयांमध्ये कामं सुरू झाली असून काही अधिकाऱ्यांची नेमणूकदेखील करण्यात आली आहे. तसेच, उद्यापासून अफगाणिस्तानातील सर्व बँका उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सोमवारी तालिबाननं परत एकदा अमेरिकेला 31 ऑगस्टपूर्वी देशातून सैन्य परत घेण्याचा इशारा दिलाय. तसेच, काबूल विमानतळावर झालेल्या गोळीबारात अमेरिकन सैन्याचा हात असल्याचा आरोप केला आहे.
सीआयए आणि तालिबानची गुप्त बैठक अमेरिका जरी तालिबानवर वरुन-वरुन कडक भूमिका घेत असल्याचं दाखवत असला तरी आतून त्याच्या मनात काहीतरी वेगळंच चालू आहे. ताज्या माहितीनुसार, सीआयएचे संचालक विल्यम जे बर्न्स यांनी काबूलमध्ये तालिबान नेता मुल्ला बरदार याची भेट घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बरदार आणि सीआयए संचालक एका उच्चस्तरीय बैठकीत आमनेसामने आले. काबूलवर कब्जा केल्यानंतर पहिल्यांदाच अशी उच्चस्तरीय चर्चा झाली, ज्यात अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं तालिबानशी चर्चा केली आहे. पण, गुप्तचर संस्थेनं या बैठकीबाबत कोणतंही अधिकृत विधान दिलेलं नाही किंवा व्हाईट हाऊसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अमेरिकेच्या अनेक वृत्तवाहिन्यांनी या बैठकीची माहिती दिली आहे.