Taliban Pakistan Border Clash: अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू असून, सीमेवर तणाव वाढला आहे. दरम्यान, तहरिक ए तालिबानपाकिस्तान या दहशतवादी संघटनेकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला असून, त्यात पाकिस्तानच्या लष्करी तळावर कब्जा मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानने मात्र याबद्दल वेगळी माहिती दिली आहे.
टीटीपी अर्थात तहरिक ए तालिबान पाकिस्तानने दावा केला आहे की, ३० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी पाकिस्तानच्या लष्करी तळावर कब्जा केला आहे. डुरंड सीमेवर हे लष्करी तळ आहे. बाजौरमधील लष्करी तळावरील कब्जा केल्यानंतर दहशतवादी जल्लोष करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
पाकिस्तानने काय म्हटले आहे?
तालिबानने लष्करी तळ बळकावल्याच्या मुद्द्यावर पाकिस्तानी माध्यमांनी वरिष्ठ लष्कर अधिकाऱ्याच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, हे लष्करी तळ काही दिवसांपूर्वी रिकामे करण्यात आले होते. इथे लष्कर तैनात करण्यात आलेले नव्हते. त्यांना नव्या लष्करी तळावर स्थलातरीत करण्यात आलेले होते.
पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पाक्तिका प्रांतावर एअर स्ट्राईक केला होता, त्यात ४६ लोक मारले गेले होते. पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, हे हवाई हल्ले तहरिक ए तालिबान पाकिस्तानच्या अड्ड्यांवर करण्यात आले होते.