तालिबान (Taliban) राजवट आल्याने लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. बाहेर पडता येत नसल्याने रोजगार बुडाला आहे. अनेकांच्या घरातील धान्य संपले आहे. या परिस्थितीमुळे तालिबानवर मेहेरबान असलेल्या आणि अफगाणिस्तानमुळे (Afghanistan) फायदा होईल या आशेवर असलेल्या पाकिस्तानने नागरिकांसाठी मदत पाठविली होती. परंतू तालिबानी दहशतवाद्यांनी अपमान केल्याने पाकिस्तान चिडला आहे. (Pakistan started humanitarian supplies to Afghanistan through Torkham)
तोरखम सीमेद्वारे पाकिस्तानने 17 ट्रक मदत साहित्य पाठविले होते. मात्र, तालिबानी सिक्युरिटी गार्डनी हे ट्रक सीमेवर थांबवत त्यावरील पाकिस्तानी झेंडे काढून टाकले. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली. पाकस्तानींनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केल्यावर तालिबानने वाद वाढत चालल्याचे पाहून आपल्या दहशतवाद्यांवर कारवाई केली आहे.
तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद याने या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. जे लोक यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे मुजाहिद म्हणाला.
मुजाहिदने सांगितले तालिबानी नेत्यांनी यावर दु:ख व्यक्त केले आहे. मदत साहित्य आणणाऱ्या ट्रकबाबत अशा प्रकारच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत, असा संदेश त्यांनी दहशतवाद्यांना पाठविला आहे. अशा प्रकारच्या घटना बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
अफगाणिस्तानला पाकिस्तानने पाठविलेल्या ट्रकमध्ये 65 टन साखर, तीन टन डाळ, 190 टन गव्हाचे पीठ, 11 टन खाद्यतेल आणि 31 टन तांदूळ होता. पाकिस्तानचे राजदूत मंसूर खान याने ट्विट करून म्हटले की, पाकिस्तानने तोरखम येथून मदत पाठविण्यास सुरुवात केली आहे. थंडीच्या काळात ब्लँकेट आणि टेंट देखील पाठविण्यात येणार आहेत. पाकिस्तानने याआधी सी 130 विमानातून 32 टन पीठ, 6 टन खाद्यतेल आदी सामुग्री अफगाणिस्तानात पाठविली होती.