काबूल- अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबानने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 95 लोकांचे प्राण गेल्याचे तसेच 163 लोक जखमी झाले असल्याची माहिती अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते वाहिद मजरुह यांनी दिली आहे.या हल्ल्याची जबाबदारी तालिबानने घेतली असून काबूलमध्ये असणाऱ्या गृहमंत्रालयाच्या जुन्या इमारतीवर हा हल्ला करण्यात आला आहे. स्फोटानंतर धुराचे प्रचंड लोट उठून काबूलचे आकाश काळवंडून गेल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी आपत्कालीन बचाव यंत्रणेच्या वाहनांनी धाव घेतली आहे. या हल्ल्यात किमान तीन स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
एका आठवड्यापुर्वी काबूलमधील इंटरकॉन्टिनेन्टल हॉटेलमध्येही तालिबानने असाच हल्ला केला होता. त्यामध्ये 18 लोकांचे प्राण गेले होते. त्याच्या आदल्याच दिवशी जलालाबादमधील सेव्ह द चिल्ड्रेनच्या शाळेवर केलेल्या हल्ल्यामध्ये तालिबानने 3 मुलांची हत्या केली होती. आज काबूलमध्ये झालेल्या स्फोटांच्या आवाजाने संपूर्ण शहर हादरून गेल्याचे काही नागरिकांनी सांगितले.अफगाणिस्तानचे संसद सदस्य मिरवाईज यासिनी हे या हल्ल्याचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. "एक रूग्णवाहिका पोलिसांच्या चेकनाक्याजवळ आली आणि तेथील जमुरियत रूग्णालयात रूग्णाला घेऊन जात असल्याचे सांगत ते पुढे गेले. त्यानंतर दुसऱ्या चेकनाक्याजवळ आल्यानंतर त्यांनी स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा स्फोट घडवला'' असे यासिनी यांनी सांगितले.एएफपी वृत्तसंस्थेच्या वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, '' रूग्णालयाजवळ अनेक लोक मृत आणि जखमी अवस्थेत पडले होते. स्फोटाची तिव्रता इतकी जास्त होती की त्यामुळे आजूबाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या तसेच काही लहान बांधकामांचे नुकसानही झाले. जखमींची संख्या वाढत गेल्यावर जमुरियत रूग्णालयात एकच गोंधळ उडाला आणि त्यांना मदत करण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टर्स व परिचारिकांनी बाहेर धाव घेतली. जखमींना उपचारासाठी नेण्यासाठी परिसरात राहाणाऱ्या लोकांनी मदत केली.