काबूल : तालिबानींनी काबूलजवळ असलेल्या प्रांताची राजधानी गझनी शहर गुरुवारी ताब्यात घेतले. अमेरिका आणि नाटो अफगाणिस्तानातून संपूर्ण सैन्य मागे घेत असताना आठवडाभर चाललेल्या निकराच्या संघर्षानंतर हे दहावे शहर सरकारने गमावले आहे. काबूलच्या नैऋत्येला १३० किलोमीटर्सवर असलेल्या गझनी शहरावर अतिरेक्यांनी आपला झेंडा लावला. शहराबाहेर असलेल्या लष्कर आणि गुप्तचर केंद्रापाशी अधूनमधून संघर्ष सुरू आहे. तालिबानींनी ते गझनीत असल्याचे व्हिडिओज आणि छायाचित्रे ऑनलाइन प्रसिद्ध केली आहेत. संघर्षावर भाष्य करण्यासाठी वारंवार विनंती करूनही अफगाणिस्तानच्या सुरक्षा दलांनी प्रतिसाद दिलेला नाही. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घानी विशेष दलांवर विश्वास ठेवून तालिबानींवर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अमेरिका आणि नाटो देशातून या महिनाअखेर सैन्य मागे घेणार आहेत.हजारो विस्थापिततालिबानींचा जो प्रवास सध्या सुरू आहे त्यातून राजधानी काबूलला अजून थेट धोका दिसलेला नाही. तरीही तालिबानींचा जो वेग आहे तो पाहता अफगाणिस्तान सरकार किती दिवस देशाचे सुकाणू हाती ठेवू शकेल हा प्रश्न आहे. सरकार आणि तालिबानी यांच्यातील संघर्षामुळे हजारो लोक विस्थापित झाले आहेत. गझनीचे लोकप्रतिनिधी मोहम्मद अरीफ रहमानी यांनी शहर तालिबानींच्या ताब्यात गेल्याचे मान्य केले.
अफगाणिस्तानातील दहावे शहर तालिबानींच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 6:45 AM