काबुल : तालिबानी दहशतवाद्यांनी अफगानिस्तानच्या उत्तरेकडील भागात असणा-या 100 हून अधिक लोकांचे अपहरण केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती अशरफ गणी यांनी दहशतवादी संघटनेबरोबर शस्त्रसंधी जाहीर केली होती. तरी सुद्धा दहशतवाद्यांकडून अशाप्रकारे कृत्य करण्यात आले आहे. अपहरण करण्यात आलेल्या लोकांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे.
कुंदूज प्रांतातील प्रमुख मोहम्मद युसूफ अयूबी यांनी सांगितले की, सोमवारी दहशतवाद्यांनी रस्त्यावरुन जाणा-या तीन बसेस थांबविल्या आणि या बसेसमधील लोकांचे अपहरण केले. ही घटना खान आबाद जिल्ह्यात घडली. दहशतवादी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडुपात लपून बसले होते. यावेळी संधी पाहून त्यांनी बसेसवर हल्ला केला. सरकारी कर्मचारी किंवा सुरक्षा कर्मचारी यांच्यावर दहशतवाद्यांचा निशाणा होता, असे मोहम्मद युसूफ अयूबी यांनी सांगितले. तसेच, सूबे ताखारचे पोलीस प्रमुख अब्दुल रहमान अकताश यांनी सांगितले की, बदखशान आणि ताखर प्रांतातील अपहरण करण्यात आलेले बस प्रवासी आहेत. प्रवासी काबूलला जात असताना त्यांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले.
दरम्यान, तालिबान या दहशतवादी संघटनेने अद्याप या घटनेची जबाबदारी स्वीकारली नाही आहे. मात्र, गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, .या घटनेमागे तालिबान संघटनेचा हात असल्याचे समजते.