काबुल: तालिबान आणि अफगाणिस्तानमध्ये मोठा संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबाननेअफगाणिस्तानच्या एकेक भागावर ताबा मिळवायला सुरुवात केली आणि अखेर काबुलमध्ये प्रवेश केला. आता संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता असणार आहे.
दक्षिण अफगाणिस्तानातील कंदहार प्रांताच्या कंदहार या राजधानीच्या शहरापासून देशाची राजधानी काबुलपर्यंत जाणाऱ्या मुख्य मार्गावरचा बहुतांश भाग तालिबान्यांच्या ताब्यात आहे. या मार्गावरची तीन किंवा चार मोठी शहरंचं अफगाणिस्तान सरकारच्या नियंत्रणात आहेत. कंदहार शहरातून बाहेर पडताच तालिबान्यांचे पांढरे झेंडे दिसू लागतात. ठिकठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला तालिबानी उभे असलेले दिसून येत आहे.
२००१ मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानातील डोंगरी भागांत तालिबानला सीमित केलं होतं पण २०२१मध्ये त्यांनी नाटो सैन्यावर हल्ला करून पुन्हा डोकं वर काढलं. २०१५ मध्ये तालिबानने युद्धदृष्ट्या महत्त्वाच्या कुंडूज परिसरावर कब्जा करून आपण पुन्हा देशावर कब्जा करणार असल्याचे संकेत दिले होते. अमेरिकेने अफगाणिस्तानातील आपला हस्तक्षेप कमी करायला सुरुवात केली आणि तालिबानची सत्ता अधिक मजबूत झाली. पाकिस्तानी दहशतवादी संघटना, पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयच्या मदतीने तालिबान अधिक मजबूत झालं.
अफगाणिस्तानातून परत येण्याच्या प्रक्रियेत अमेरिकेने तालिबानशी शांततेची चर्चा सुरू केली. या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या पण त्या निष्फळ ठरल्या. तालिबानने अफगाणिस्तानातील शहरं आणि सैनिकी तळ काबीज करायला सुरुवात केली. एप्रिल २०२१मध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानातून परतणार असल्याचं जाहीर केल्यावर तर तालिबानने जोरदार आगेकूच सुरू केली.
९० हजार तालिबानी दहशतवाद्यांनी ३ लाखांहून अधिक अफगाणी लष्करी फौजेला नतमस्तक व्हायला भाग पाडलं. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी, त्यांचे सहकारी, अफगाणी सैन्याचे कमांडर अब्दुल रशीद दोस्तम आणि इतर अनेकांना ताजिकिस्तान आणि इराणमध्ये शरणार्थी म्हणून जावं लागलं आहे.
दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्यासाठी एक रणनीती आखून ते वाटचाल करत आहेत. तालिबानी संघटनेमध्ये आणि त्या संघटनेच्या बंडखोरांमध्ये मात्र बराच बदल झाल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे. हा बदल तालिबानकडे मोठ्या प्रमाणावर आलेल्या संपत्तीमुळे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एका माहितीनुसार, अमेरिकेने सोव्हिएत संघाला शीतयुद्धात मात देण्यासाठीच तालिबानच्या स्थापनेला छुपा पाठिंबा दिला. एवढेच नव्हे, तर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि पैसा पाकिस्तानच्या माध्यमातून पोहोचवण्याचे काम अमेरिकेने केल्याचे सांगितले जाते.
दूतावासातील कर्मचाऱ्यांना अमेरिकेने केले एअरलिफ्ट-
तालिबानने काबुलमध्ये प्रवेश करताच अमेरिकेने दूतावासातील कर्मचाऱ्यांना एअरलिफ्ट केले. त्यापूर्वी सर्व संवेदनशील माहिती डिलीट करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघारी सुरू केल्यानंतर तालिबानने हळूहळू भूभाग ताब्यात घेण्यास सुरुवात केली. ११ सप्टेंबरपर्यंत संपूर्ण सैन्य माघारी होईल, असे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी यापूर्वीच सांगितले आहे.
बदला घ्यायचा नाही-
तालिबानी प्रवक्त्यांनी सांगितले की, आम्हाला कोणाचाही बदला घ्यायचा नाही. सरकार आणि लष्करात सेवा देणाऱ्यांना माफ करण्यात येईल. नागरिकांनी घाबरू नये. कोणीही भीतीने देश सोडून जाऊ नये, असे आवाहनही केले. मात्र, नागरिकांनी भीतीपोटी काबुल सोडण्यास सुरुवात केली असून शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे.