तालिबानने लोकप्रिय बॅटल रॉयल गेम प्लेअर अननोन्स हॅटलग्राउंड्सवर (PUBG) बॅन आणण्याची घोषणा केली आहे. पुढील तीन महिन्यांत हा गेम अफगाणिस्तानात बॅन करण्यात येणार आहे. यासाठी, तालिबानने, हा गेम हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला आहे. अफगाणिस्तानच्या टेलिकम्युनिकेशन मंत्रालयाने याच आठवड्यात शरिया लॉ इनफोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशन आणि सुरक्षा क्षेत्रातील प्रतिनिधींसोबत बैठक घेतली आणि येत्या ९० दिवसांत देशात PUBG मोबाइल आणि टिकटॉक अॅप्सवर बंदी घालण्यात येईल, असा निर्णय घेतला आहे.
अफगाणिस्तानातील खामा प्रेस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, PUBG मोबाइल गेम पुढील तीन महिन्यांच्या आत बॅन करण्यात येईल. याशिवाय, टिकटॉक अॅप एका महिन्याच्या आत बॅन करण्याचेही भाष्य करण्यात आले आहे. यासाठी अफगाण सरकारने टेलिकम्युनिकेशन आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना बॅन लागू करण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली असून वेळही देण्यात आली आहे.
तालिबानच्या या निर्णयानंतर, इंटरनेट यूजर्सनी मीम्स शेअर करायला सुरुवात केली आहे. ते तालिबानची खिल्लीही उडवताना दिसत आहेत. कारण खुद्द तालिबाननेच हिंसाचाराच्या जोरावर अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. तसेच, हा गेम हिंसाचाराला उत्तेजन देतो, असे सांगत त्यावर बंदी घालत आहे.
तालिबानने लाखो वेबसाइट्स केल्या आहेत बॅन - PUBG वरील बॅनच्या घोषणेपूर्वी तालिबानने, जवळपास 2.3 कोटी वेबसाइट्स अफगाणिस्तानातील नागरिकांसाठी बॅन केल्या आहेत. या वेबसाइट्सवर अैतिक कंटेन्ट दाखविला जात होता, असे तालिबान सरकारचे म्हणणे होते.
भारत आणि पाकिस्तानातही PUBG बॅन - अफगाणिस्तानपूर्वी भारत आणि पाकिस्ताननेही 2020 मध्येच PUBG गेमवर बंदी घातली आहे. या गेमचे इंडिया-ओनली व्हर्जन BGMI गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आले होते. ते शेवटच्या तिमाहीत बॅन करण्यात आले. तसेच, हा गेम हिंसाचाराला प्रोत्साहन देतो आणि मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतो, असे सांगत पाकिस्ताननेही या गेमवर बंदी घातली आहे.