काबूल : काश्मीरच्या प्रश्नामध्ये तालिबानी अजिबात हस्तक्षेप करणार नाही. आम्हाला भारताशी उत्तम संबंध निर्माण करायचे आहेत. अफगाणिस्तानमधील शीख, हिंदूंना तालिबानी कोणतीही इजा करणार नाही. त्यांना संपूर्ण संरक्षण दिले जाईल असे तालिबानी नेते अनास हक्कानी यांनी म्हटले आहे.
अनास यांचे वडील जलालुद्दीन हक्कानी यांनी अफगाणिस्तानमध्ये अमेरिका व त्याआधी सोव्हिएत रशियाच्या फौजेशी संघर्ष केला होता. अनास यांचा नातेवाईक सिराजुद्दीन हा हक्कानी नेटवर्कचा प्रमुख आहे. अनास हक्कानी हे यांनी एका मुलाखतीत सांगितले की, हक्कानी नेटवर्कमार्फत दहशतवादी कारवाया केल्या जातात हा आरोप चुकीचा आहे. आम्हाला पाकिस्तानचा पाठिंबा नाही. आम्ही तो कधी मागितलाही नव्हता. काश्मीर प्रश्नामध्ये आम्हाला हस्तक्षेप करण्याची कधीही इच्छा नव्हती. तसे आमचे धोरणही नाही. त्यामुळे त्याविरोधात जाऊन तालिबानी कोणतेही कृत्य करणे शक्य नाही.
ते म्हणाले की, अफगाणिस्तानसमोर असलेले सर्व प्रश्न आम्ही टप्प्याटप्प्याने सोडविणार आहोत. आम्ही कोणाशीही चर्चा कऱण्यास तयार आहोत. अफगाणिस्तानची परकीयांपासून मुक्तता करण्यासाठी आम्ही २० वर्षे संघर्ष केला. मात्र जगभरातील विशेषत: भारतातील प्रसारमाध्यमे तालिबानींबद्दल अतिशय नकारात्मक पद्धतीने लिखाण करत आहेत. तालिबानी नेते अनास हक्कानी यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये तालिबानींनी दिलेल्या लढ्यात पाकिस्तानमध्ये बनविलेल्या एकाही शस्त्राचा वापर करण्यात आला नाही.