काबुल: 15 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानवर सत्ता मिळवल्यानंतर भारताने भारत-अफगाणिस्तान विमान सेवा बंद केली होती. पण, आता तालिबान सरकारने अफगाणिस्तान आणि भारतादरम्यान ही विमान सेवा पुन्हा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, तालिबानने या प्रकरणी भारत सरकारला पत्रही लिहिलं आहे. हे पत्र 7 सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान नागरी उड्डयन प्राधिकरणाचे कार्यवाह हमीदुल्ला अखुंजादा यांनी भारताच्या नागरी उड्डयन महासंचालनालयाचे (डीजीसीए) अरुण कुमार यांना लिहिलं होतं. नागरी उड्डयन मंत्रालय या पत्रावर विचार करत आहे.
पत्रात काय लिहिलं ?
अखुंजादाने डीजीसीएला लिहीलेल्या पत्रात म्हटलं की, ''काही दिवसांपूर्वी अमेरिकन सैन्याने काबूल विमानतळ खराब आणि अक्षम केलं होतं. परंतु आमचा मित्र देश कतारच्या तांत्रिक सहाय्याने हे विमानतळ पुन्हा एकदा कार्यान्वित करण्यात आलं आहे. 6 नोव्हेंबर 2021 रोजी या संदर्भात नोटम (एअरमनना नोटीस) जारी करण्यात आली आहे. त्यामुळे भारताने भारत-अफगाणिस्तान विमान सेवा पुन्हा सुरू करावी."
भारताने तालिबानला मान्यता दिलेली नाही
तालिबानच्या अंतरिम सरकारला भारताने अद्याप मान्यता दिलेली नाही. मात्र, दोहामध्ये कतारमधील भारताचे राजदूत दीपक मित्तल आणि तालिबान नेते शेर मोहम्मद अब्बास स्टँकझाई यांची भेट झाली आहे. अमेरिकन सैन्य गेल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला. नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताकडून काबूलला शेवटचे विमान 21 ऑगस्ट रोजी उडाले होते. एअर इंडियाच्या विमानाने प्रथम दुशान्बे आणि नंतर नवी दिल्लीला उड्डाण केले.