नवी दिल्ली/काबुल - अफगाणिस्तानच्या बाघलान प्रांतात रविवारी सशस्त्र तालिबान्यांनी महाराष्ट्रातील आरपीजी समूहाच्या कंपनीसाठी काम करणाऱ्या सात अभियंत्यांचे अपहरण केले.आरपीजी समूहाची कंपनी ‘केईसी’ला अफगाणमध्ये इलेक्ट्रिसिटी सब-स्टेशनचे कंत्राट मिळालेले असून, अपहृत अभियंते हे काम करण्यासाठी जात असताना त्यांना पळवून नेण्यात आले. त्यांना घेऊन जात असलेल्या अफगाणी चालकालाही तालिबान्यांनी ताब्यात घेतले आहे.अपहरणाचा तपशील माहीत करून घेण्यासाठी आम्ही अफगाण अधिकाºयांच्या संपर्कात असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. मंत्रालयाचे प्रवक्ता नवी दिल्लीत म्हणाले की, अफगाणिस्तानच्या बाघलान प्रांतात भारतीय नागरिकांचे अपहरण झाल्याची आम्हाला कल्पना आहे. त्याबाबतचा अधिक तपशील जाणून घेण्यासाठी आम्ही अफगाण अधिका-यांच्या संपर्कात आहोत. अफगाणिस्तानात वीज पुरवठ्याचे काम करणा-या भारतीय कंपन्यांत केईसी ही सर्वात मोठी आहे.बाघलानचे गव्हर्नर अब्दुलहाय नेमाती यांनी तालिबान गटाने या कर्मचाºयांचे अपहरण केल्याचे व पुल-ए-खुमरी शहराच्या दांड-ए-शहाबुद्दीन भागात त्यांना नेल्याचे सांगितले. अफगाणिस्तानचे अधिकारी स्थानिक लोकांच्या माध्यमातून तालिबान्यांशी बोलले आहेत. सरकारी कर्मचारी असल्याचे वाटल्यावरून तालिबान्यांनी हे अपहरण केल्याचे नेमाती यांनी म्हटले आहे.आरपीजीचे चेअरमन हर्ष गोएंका यांनी आपल्या कर्मचाºयांना सोडवण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना मदत करण्याची विनंती केली आहे.
महाराष्ट्रातील कंपनीच्या सात अभियंत्यांचे अपहरण, अफगाणिस्तानमध्ये तालिबानींचे कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 5:57 AM