नवी दिल्ली - अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तानातून गाशा गुंडाळण्याचे ठरवताच शिरजोर झालेल्या तालिबानने अवघ्या काही दिवसांतच अफगाणिस्तानचा ताबा मिळवला. आता त्यांची अफगाणिस्तानात अनिर्बंध सत्ता राहील. ती किती दिवस, महिने आणि वर्षं टिकेल, हे आताच सांगता येणे अशक्य आहे. तालिबान सरकार स्थापन करणार हे निश्चित झालं असलं तरी अद्याप तालिबानने याबाबत निर्णय घेतला नाही. तालिबानने सरकार स्थापनेबाबत महत्त्वाची घोषणा केली.
जगाचं लक्ष लागलेल्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानच सरकार आल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे काही देशांनी आपला पाठिंबाही तालिबानी सरकारला देऊ केला आहे. तर, दुसरीकडे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतीपदाची सुत्रे हाती घेतली आहेत. सालेह यांनी तालिबान्यांना घाबरून देश सोडणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. ते पंजशीरमध्ये आहेत. "पाकिस्तानसाठी अफगाणिस्तान देश इतका मोठा आहे की ते कधीच देशाला गिळंकृत करू शकत नाहीत. तसंच तालिबान्यांना शासन लागू करण्यासाठी अफगाणिस्तान देश खूप मोठा आहे. त्यांना ते जमणार नाही", असं म्हटलं आहे.
तालिबाननेही सरकार स्थापनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. तालिबानकडून अफगाणिस्तानमध्ये आगामी सरकार स्थापन करण्याचा निर्णय किंवा घोषणा ३१ ऑगस्टपर्यंत केली जाणार नसल्याचे म्हटले आहे. याबाबत टाईम्स वृत्तसंस्थेनं वृत्त दिले आहे. अमेरिकी सैन्यमाघारीची मुदत संपल्यानंतर तालिबानच्या सरकारची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे समजते.
अफगाणिस्तानची तिजोरी खंक
अफगाणिस्तानची तिजोरी खंक असल्याने तालिबान ओसाडगावचे पाटील ठरण्याचीच शक्यता जास्त आहे. द अफगाणिस्तान बँकेकडे एकूण १० अब्ज डॉलरची संपत्ती आहे. या संपत्तीत १.३ अब्ज डॉलर म्हणजेच साडेनऊ हजार कोटी रुपये मूल्याच्या सोन्याचा समावेश आहे. ३६ कोटी डॉलर मूल्याची परकीय गंगाजळीही मध्यवर्ती बँकेकडे जमा आहे. बँकेकडे सोन्याच्या विटाही आहेत. मात्र, हा सर्व ऐवज बँकेने देशाच्या बाहेर सुरक्षित ठेवला आहे. इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट (आयबीआरडी) यांच्या माध्यमातून अफगाणिस्तानी बँकेने ही तजवीज केली आहे.