गेल्या वर्षभरापासून कोरोना व्हायरसच्या (Covid-19) प्रकोपाला संपूर्ण जग सामोरं जात आहे. पण यात असेही काही देश आहेत की ज्यांना कोरोनाबाबत अजूनही शंका आहेत. यात टांझानिया (Tanzania) देशाचे राष्ट्रपती जॉन मागुफुली (John Magufuli) यांचाही समावेश आहे. पण मागुफुली यांच्याच बाबत आता एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. मागुफुली यांनाच कोरोनाची लागण झाल्याचा दावा विरोधी पक्ष नेत्यानं केला आहे. जॉन मागुफुली यांना कोरोना झाला असून ते उपचारासाठी भारतात गेले आहेत, असा दावा त्यांच्या विरोधकांनी केला आहे. दरम्यान, भारताकडून अद्याप यावर कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
गेल्या दोन आठवड्यांपासून जॉन मागुफुली सार्वजनिक कार्यक्रमांना दिसलेले नाहीत. त्यामुळेच मागुफुली हे कोरोनाबाधित झाले असून ते क्वारंटाइन झाले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. पण देशातील मुख्य विरोधी पक्षाचे नेते टुंडु लिसु (Tundu Lissu) यांनी केनियातील (Kenya) वैद्यकीय आणि संरक्षण सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रपती जॉन मागुफुली यांना केनियातील एका रुग्णालयानं भारतात पुढील उपचार घेण्यासाठी सल्ला दिल्याचं सांगितलं आहे. मागुफुली सध्या कोमात असल्याचा देखील दावा करण्यात आला आहे. दरम्यान, विरोधी पक्ष नेत्यानं यासंदर्भात कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. तर टांझानिया सरकार देखील मागुफुली यांच्या ठावठिकाण्याबाबत आणि आरोग्यबाबत चुप्पी साधून आहेत.