लाहोर : येथील एका लोकप्रिय उद्यानात रविवारी करण्यात आलेल्या आत्मघातकी हल्ल्यातील बळींची संख्या वाढूून ७२ झाली असतानाच तालिबानने या हल्ल्याचे लक्ष्य ईस्टर साजरा करणारे ख्रिश्चन होते, असा दावा केला आहे. मृतांत २९ बालकांचा समावेश आहे. जखमींपैकी तिघांचा सोमवारी मृत्यू झाला. त्यामुळे बळींचा आकडा वाढला, असे पंजाब आपत्कालीन सेवेतील बचाव पथकाच्या प्रवक्त्या दीबा शहनाज यांनी सांगितले. ३०० जखमींपैकी २६ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे, असेही त्या म्हणाल्या. मृतांत २९ बालके व आठ महिलांचा समावेश आहे. मृतांपैकी २० जण ख्रिश्चन तर उर्वरित बहुतांश मुस्लिम आहेत. अल्लाम्मा ए इक्बाल टाऊनमधील गुलशन-ए-इक्बाल उद्यानात लोकांची प्रचंड गर्दी असताना हल्ला करण्यात झाला. ईस्टर संडेमुळे ख्रिश्चन कुटुंबेही मोठ्या संख्येने उद्यानात आलेली होती. तेहरीक ए तालिबान पाकिस्तानचा फुटीर गट जमातुल अहरारने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. विशीतील आत्मघातकी हल्लेखोराने हा हल्ला घडवून आणला होता. ईस्टर साजरा करणाऱ्या ख्रिश्चनांना लक्ष्य करण्यात आले होते, असे जमातुलचा प्रवक्ता एहसानउल्ला एहसान याने म्हटले. तथापि, पंजाब सरकारने केवळ ख्रिश्चनांना लक्ष्य केल्याचा तालिबानचा दावा फेटाळून लावला आहे. या उद्यानात केवळ ख्रिश्चन येत होते असे नाही. त्यामुळे ख्रिश्चन नाहीतर पाकचे नागरिक हल्ल्याचे लक्ष्य होते, असे लाहोर जिल्हा समन्वय अधिकारी सेवानिवृत्त कॅप्टन मोहंमद उस्मान यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)