वॉशिंग्टन/नवी दिल्ली : अमेरिकेने चीनवरील समतुल्य आयात शुल्क (रिसिप्रोकल टॅरिफ) वाढवून २४५ टक्के केले आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान व कार्यालय असलेल्या ‘व्हाइट हाउस’ने मंगळवारी ‘तथ्य पत्र’ जारी केले. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिका व चीन यांच्यातील ‘व्यापारयुद्ध’ शिगेला पोहोचले असतानाच ट्रम्प प्रशासनाने आयात शुल्कात वाढ केली आहे.
ट्रम्प यांनी समाजमाध्यम मंच ‘ट्रुथ सोशल’वर टाकलेल्या पोस्टमध्ये चीनने अमेरिकी विमान उत्पादक कंपनी बोइंगकडून विमाने स्वीकारण्यास नकार दिल्याचे म्हटले आहे.
‘कराराप्रमाणे बोइंगकडून विमाने स्वीकारण्याचे चीनने नाकारले आहे. चीनसारख्या विरोधकांसोबतच्या ‘व्यापार युद्धा’त आपल्या देशाचे तसेच शेतकऱ्यांचे संरक्षण करण्याचा निर्धार आम्ही केला आहे,’ असे ट्रम्प यांनी म्हटले.
चीनने नेमला नवा मध्यस्थ
बुधवारी चीनने ली चेंगगँग यांची नवीन आंतरराष्ट्रीय वाटाघाटी मध्यस्थपदी नेमणूक केली. ली हे वँग शौवेन यांची जागा घेतील. वँग यांनी २०२० च्या चीन-अमेरिकी व्यापार कराराच्या वाटाघाटीत भाग घेतला होता.
अमेरिका सलग चौथ्या वर्षी भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार
वित्त वर्ष २०२४-२५ मध्ये अमेरिका सलग चौथ्या वर्षी भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार बनला आहे. दोन्ही देशांचा द्विपक्षीय व्यापार १३१.८४ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने या संदर्भातील आकडेवारी जारी केली आहे.