Donald Trump Latest News: २ एप्रिल रोजी अमेरिकेत लिबरेशन दिवस साजरा करण्याची भूमिका ट्रम्प यांनी मांडली असून, याच दिवसापासून नवीन टॅरिफ धोरण लागू केले जाणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच टॅरिफ वाढवण्याचे संकेत दिले होते. अखेर टॅरिफचे शस्त्र त्यांनी उपसले असून, याचा १५ देशांवर मोठा परिणाम होणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रशासन सातत्याने ही भूमिका मांडत आहे की, सध्या व्यापार नियमांमुळे अमेरिकेपेक्षा इतर देशांनाच जास्त फायदा होत आहे. अमेरिकेच्या अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांनी अलिकडेच डर्टी १५ म्हणून काही देशांचा उल्लेख केला. हे देश अमेरिकेच्या वस्तूंवर प्रचंड टॅरिफ लावत असल्याचे त्या म्हणाल्या.
वाचा >>ट्रम्प आणि ओबामा 2028 मध्ये आमने-सामने येणार? अमेरिकन राजकारणात चर्चेला उधाण
बेसेन्ट यांनी हे डर्टी १५ देश कोणते याबद्दल कोणताही उल्लेख केला नाही. पण, अमेरिकेच्या वाणिज्य विभागाच्या २०२४ व्यापार तूट रिपोटमधून काही गोष्टी स्पष्ट होतात.
ते १५ देश कोणते?
या रिपोर्टनुसार, ज्या देशांसोबतच्या व्यापारात अमेरिकेला सर्वाधिक नुकसान होत आहे, त्यात चीन, युरोपियन यूनियन, मेक्सिको, व्हिएतनाम, आयर्लंड, जर्मनी, तैवान, जापान, दक्षिण कोरिया, भारत, थायलंड, इटली, स्वित्झर्लंड, मलेशिया आणि इंडोनिया हे देश आहेत.
आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या मते डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणांचा फटका या देशांना अधिक बसू शकतो. याशिवाय अमेरिका व्यापार प्रतिनिधित्व कार्यालयाच्या वतीने २१ देशांची नावे जाहीर केली गेली आहेत. ज्यांच्यासोबत अमेरिकेची देवाण-घेवाण योग्य नाही.
या देशांमध्ये अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, युरोपीय यूनियन, भारत, इंडोनेशिया, जापान, दक्षिण कोरिया, मलेशिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, स्वित्झर्लंड, तैवान, थायलंड, टर्की, ब्रिटेन आणि व्हिएतनाम आहेत.
सध्या तरी डोनाल्ड ट्रम्प यांनी डर्टी १५ या देशांवरच जशास तसा टॅरिफ आकारण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे याचा मोठा फटका भारतालाही बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडून अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर टॅरिफचा मुद्दा अनेकदा उपस्थित केला आहे.