कराची : पाकिस्तानात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. एकामागो एक अशा दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना ठार केले जात आहे. अज्ञात हल्लेखोरांनी जैश ए मोहम्मदचा दहशतवादी तारीक रहीम उल्लाहला ठार केले आहे. भारत विरोधी एका सभेमध्ये भाग घेण्यासाठी जात असताना त्याच्यावर कोणीतरी गोळ्या झाडल्याचे समजते आहे. कराचीमध्ये हा प्रकार घडला आहे.
तारिक हा पाकिस्तानातील एक प्रसिद्ध मौलाना होता, त्याचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंची गर्दी जमा व्हायची. या मौलानावर अचानक गोळीबार झाला त्यात त्याचा मृत्यू झाला. मौलाना ज्या सभेत सहभागी होण्यासाठी जात होता, ती कराचीत्या ओरंगी टाऊनमध्ये होती. पोलिसांनी हा टार्गेट किलिंगचा प्रकार म्हटले आहे. मौलानाच्या हत्येवर पाकिस्तानी मीडियाने चुप्पी साधली आहे. गेल्या काही काळापासून पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या म्होरक्यांची हत्या होऊ लागली आहे.
अलीकडेच खैबर पख्तूनख्वामधील बाजौरमध्ये लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी अक्रम खान उर्फ अक्रम गाझी मारला गेला. अक्रमची हत्या हा आयएसआय तसेच लष्कर प्रमुख हाफिज सईदसाठी मोठा धक्का होता. लश्करसाठी गाझी हा भारताविरुद्धचा सर्वात महत्त्वाचा दहशतवादी होता. अक्रम गाझी खोऱ्यातील तरुणांना भारताविरुद्ध प्रभावीपणे भडकवत होता.
आतापर्यंत अज्ञात हल्लेखोरांच्या यादीत लष्करचे दहशतवादी आघाडीवर होते. पण आता जैशचे दहशतवादीही मारले जात असल्याचे तारिकच्या हत्येवरून स्पष्ट झाले आहे.