टोमॅटो दिसायला आकर्षक दिसत असले तरी त्यांना नेहमीची चव नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येत आहेत. जास्तीत उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड शेतकरी करीत आहेत. दुर्दैवाने भरपूर उत्पादन देणाऱ्या या जाती चवीला निकृष्ट आहेत. एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. चीनमधील शेनझेन येथील चायनीज अॅकॅदमी आॅफ अॅग्रिकल्चर सायन्स या संस्थे अंतर्गत कार्यरत असलेल्या अॅग्रिकल्चर जिनोम इन्स्टिट्यूटने हा अभ्यास केला आहे. इन्स्टिट्यूटचे सह-मुख्य संशोधक सॅनवेन हुआंग यांनी सांगितले की, बाजारात येणारे टोमॅटो नुसतेच ‘वॉटर बॉम्ब’ आहेत. चवीला बिलकूल पानचट लागतात, अशा तक्रारी येत होत्या. त्यावरून शास्त्रज्ञांनी अभ्यास प्रकल्प हाती घेतला. सध्या उपलब्ध असलेल्या ३९८ टोमॅटो जातींचा त्यात अभ्यास करण्यात आला. टोमॅटोत चव निर्माण करणारे ३३ रासायनिक घटक आढळून आले. ही रसायने निर्माण करणारे २५0 जेनेटिक आयोसी (गुणसूत्रांचे विशिष्ट बिंदू) असतात. शेतकरी मोठ्या आकाराचे आणि मजबूत बांधणीचे टोमॅटो जाती उत्पादनासाठी निवडतात. कारण ग्राहक मोठ्या टोमॅटोकडे लवकर आकर्षित होतात. तसेच मजबूत फळे वाहतुकीसाठी चांगली असतात. मात्र अशा जातीच्या टोमॅटोमध्ये चव निर्माण करणाऱ्या घटकांचे प्रमाण अत्यल्प असते. तसेच टोमॅटो शीतगृहात अथवा घरातील फ्रिजमध्ये ठेवले जातात, तेव्हा काही चव घटक निष्प्रभ होतात. त्यामुळे टोमॅटो नेहमीची नैसर्गिक चव हरवून बसतात.
भरघोस उत्पन्नाच्या नादात हरवली टोमॅटोंची चव!
By admin | Published: February 06, 2017 12:38 AM