पाकिस्तानमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. आर्थिक संकटातून थोडासा दिलासा मिळत नाही तोच आता पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सरकार जाणार आहे. यामुळे पाकिस्तानात नवीन कार्यवाहक पंतप्रधानाच्या नावाची चर्चा आणि वाद सुरु झाले आहेत. शरीफ यांच्या सरकारचा कार्यकाळ येत्या ऑगस्टमध्ये संपणार आहे.
पाकिस्तानात येत्या नोव्हेंबरमध्ये निवडणूक प्रस्तावित करण्यात आली आहे. तोवर देशाचे कामकाज सांभाळण्यासाठी एका काळजीवाहू सरकारची स्थापना करण्यात येणार आहे. यामुळे सत्ताधारी पीडीएम आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. या मुद्द्यावर पीपल्स पार्टीचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी दुबईत नवाझ शरीफ यांच्याशी बैठकांवर बैठका करत आहेत.
मित्रपक्षांनी एकूण पाच नेत्यांची निवड केली असून, त्यापैकी एकाला हंगामी पंतप्रधान बनवले जाऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी हा दावा केला आहे. पीपीपी आणि पीएमएल-एन यांनी मिळून चार ते पाच नावे निश्चित केली आहेत, ज्यांची इतर पक्षांशी चर्चा केली जाईल. यावर एका आठवड्यात निर्णय घेतला जाईल.
संसद कार्यकाळाच्या दोन दिवस आधी विसर्जित केली जाईल. यामुळे पुढील ९० दिवसांत निवडणूक घेतल्यास फायदा होईल. जर विलंब लागला तर त्रास होणार आहे, असे आसिफ म्हणाले. काळजीवाहू पंतप्रधानपदासाठी अर्थमंत्री इशाक दार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आलेला नाही किंवा कोणत्याही स्तरावर त्यांनी कोणतीही इच्छा व्यक्त केलीय, असेही त्यांनी स्पष्ट केले.