ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - इंग्लंडमधला बडा उद्योगसमूह अशी ओळख असलेल्या टाटा समूहाला ब्रेक्झिटचा चांगलाच फटका बसला असून टाटा समूहातील बड्या कंपन्यांच्या शेअरचे भाव कोसळले आणि एकत्रितपणे कंपनीच्या भागभांडवलाला तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा कौल ब्रिटनमधल्या जनतेने दिल्यानंतर अर्थकंप झाला असून त्याची झळ जगभरात जाणवत आहे. टाटा मोटर्सच्या मालकिची जग्वार लँड रोव्हर ही ब्रिटिश कंपनी आहे, तसेच टाटा स्टीलही ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. ब्रेक्झिटनंतर भारतीय शेअर बाजारात चांगलीच पडझट झाली, ज्यामध्ये टाटा मोटर्स, टाटा स्टील व टीसीएसचे शेअर अनुक्रमे 8 टक्के, 6 टक्के व 3 टक्के घसरले, ज्यांचे एकत्रित मूल्य 30 हजार कोटी रुपये आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री टाटा समूहाची नाव या वादळातून कशी तारतात, याकडे सगळ्या उद्योग जगताचे लक्ष लागले आहे.
ब्रिटनमध्ये टाटा समूहात 60 हजार कर्मचारी
टाटा समूहाच्या 19 कंपन्या इंग्लंडमध्ये व्यवसाय करत असून तब्बल 60 हजार ब्रिटिश कर्मचारी टाटा समूहात काम करतात. युरोपीय महासंघातील देशांमध्ये वाहने विकण्यासाठी टाटा मोटर्सला पुढील चार वर्षांमध्ये 1.47 अब्ज डॉलर्सचा अतिरिक्त कर भरावा लागणार आहे, तसेच युरोपीय महासंघातून सुटे आयात करताना 4 टक्के आयात कर भरावा लागणार आहे. टाटा स्टीलने इंग्लंडमधला व्यवसाय विकायला काढला आहे, या बदलांमुळे त्यातही अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.
टाटा मोटर्सच्या नफ्यात 90 टक्के वाटा JLR चा
टाटा मोटर्सच्या नफ्यामध्ये 90 टक्के हिस्सा जग्वार लँड रोव्हरचा आहे आणि कंपनीच्या विक्रीपैकी 20 टक्के गाड्या युरोपमधल्या अन्य देशांमध्ये विकल्या जातात, आणि या अन्य देशांमधूनच सुमारे 40 टक्के सुटे भाग घेतले जातात, यावरून टाटा मोटर्सला ब्रेक्झिटचा किती फटका बसेल याची कल्पना येते.
ब्रिटनमध्ये TCS साठी काम करतात 11 हजार कर्मचारी
तसेच, उत्पन्नाच्या बाबतीत टीसीएससाठी इंग्लंड हा दुसऱ्या क्रमांकाचा देश असून ( एकूण उत्पन्नाच्या 16 टक्के ) इंग्लंडमध्ये टीसीएसचे 11 हजार कर्मचारी काम करतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर ब्रेक्झिटचे पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले आणि टाटा समूहातील प्रमुख कंपन्यांच्या शेअर्सचे भाव गडगडले आणि समूहाच्या बाजारातील भागभांडवलाचे मूल्य 30 हजार कोटी रुपयांनी एकाच दिवशी म्हणजे शुक्रवारी घटले.