वॉशिग्टन, दि. 31- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम हे नेहमीच माध्यमांमध्ये तसंच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. ट्रम्प यांची वादग्रस्त वक्तव्य किंवा त्यांचे नवनवीन निर्णय या सगळ्याची नेहमीच चर्चा ऐकायला मिळते. ट्रम्प यांच्या फॉलोअर्सची संख्याही तितकीच आहे. अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यत सगळेच डोनाल्ड ट्रम्प यांना फॉलो करतात. अमेरिकेतील एका नऊ वर्षाच्या मुलाने डोनाल्ड ट्रम्प यांना लिहिलेले पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. या नऊ वर्षाच्या मुलाने ट्रम्प यांना पत्र लिहून तुमच्याकडे किती पैसे आहेत? असा थेट प्रश्न विचारला आहे. अमेरिकेतील मीडिया तसंच सोशल मीडियावर या मुलाची चांगलीच चर्चा सुरू आहे. या मुलाचं नाव डिलन असं आहे. डिलन हा तिसरीत शिकत असून त्याने हाताने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना पत्र लिहिलं आहे. डोनाल्ड ट्रम हे माझे आवडते राष्ट्रपती आहेत. माझ्या वाढदिवसाची थीमसुद्धा ट्रम्प थीम होती, असं या मुलाने पत्रातून सांगितलं आहे.
Thank you Dylan (aka Pickle) for your letter to @POTUS! We hope to meet you soon! pic.twitter.com/RtTb6KtsZN
— Sarah H. Sanders (@SHSanders45) July 26, 2017
बुधवारी व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या प्रेस ब्रिफिंगमध्येही या पत्राचा उल्लेख करण्यात आला आहे. या मुलाने पत्रात म्हंटलं आहे,'तुमचं वय काय आहे ? व्हाईट हाऊस किती मोठं आहे? तुमच्याकडे किती पैसे आहेत? असे प्रश्न डिलनने पत्रात विचारले आहेत. तसंच लोकांना तुम्ही का आवडत नाही? याबद्दलही आश्चर्य व्यक्त केलं आहे. डिलनने त्याच्या पत्रातून ट्रम्प यांच्यासोबत मैत्री करण्याचीही इच्छा बोलून दाखविली आहे. अमेरिकेतील मीडिया रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी डिलनची मैत्रीची शिफारस स्वीकारली आहे. तसंच व्हाइट हाऊसकडून डिलन आणि त्याच्या परिवाराला राष्ट्रपती भवनात येण्यासाठी आमंत्रण देण्यात आलं आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लहान मुलाकडून पत्र यायची ही पहिलीच वेळ नाही. तर याआधीही ट्रम्प यांचं कौतुक करणारी पत्रं आली असल्याचं व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी सारा सँडर्स यांनी सांगितलं आहे. ट्रम्प प्रशासनाच्या प्रवक्त्या सारा सँडर्स यांनी ट्विटरवर हे पत्र पोस्ट केल्यानंतर अनेकांनी ते शेअर केलं. तसंच ट्रम्प यांच्याकडून प्रसिद्धीसाठी नवा स्टंट केला जात असल्याची टीका अनेकांनी केली. तसंच काही जणांनी या पत्राला समर्थनही दाखविलं.