जवळपास तीन वर्षे पूर्ण झाली तरी रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध थांबलेलं नाही. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर हे युद्ध संपुष्टात आणण्याच्या दिशेने निर्णायक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहेत. त्यात आज डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या भेटीवेळी युद्धविराम हाच प्रमुख मुद्दा राहिला. मात्र यावरून डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात तुफान खडाजंगी झाल्याचं वृत्त आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना हे युद्ध चुकीच्या दिशेने जात आहे. युक्रेनने रशियासोबत युद्धविराम घोषित करण्याची तडजोड केली पाहिजे, असे स्पष्ट शब्दात सांगितले. मात्र झेलेन्स्की यांनीही आक्रमक पवित्रा घेत युद्धविरामाच्या प्रस्तावाचा तीव्र शब्दात विरोध केला. तसेच रशियासोबत कुठलीही तडजोड करणार नाही, असे स्पष्ट केले. यावरून डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकही झाली.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या युद्धविरामाच्या प्रस्तावाला झेलेन्स्की यांनी विरोध केला. त्यांनी सांगितले की, आम्हाला केवळ युद्धविरामाची आवश्यकता नाही आहे. आम्ही आधीही असं केलं आहे. मात्र व्लादिमीर पुतीन यांनी २५ वेळा याचं उल्लंघन केलं आहे. त्यात तुम्ही राष्ट्राध्यक्ष असतानाही, असा प्रकार घडला होता, असे झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांना सुनावले.
यावेळी झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांना युक्रेनच्या दौऱ्यावर येण्याचं निमंत्रण दिलं. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी आता तुमच्याकडे कुठलाही मुद्दा नाही आहे. तुम्ही तिसऱ्या महायुद्धाचा जुगार खेळत आहात, असे झेलेन्स्की यांना सुनावले. दरम्यान, या भेटीवेळी युद्धविरामाच्या चर्चेचा भाग म्हणून अमेरिकेसाठी युक्रेनमधील खनिज कराराबाबतही चर्चा झाली.