अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर, भारताने कठोर भूमिका घेतली असून केंद्र सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. यातच, झटापट आणि दोन्ही देशांच्या सीमा वादावर चीनने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सीमेवर भारता सोबतची स्थिती स्थिर असल्याचे, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. "राजकीय आणि लष्कराच्य माध्यमातून चर्चा सुरू आहे" -अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झटपाट झाल्याचा मुद्दा भारताने उपस्थित केल्यानंतर, चीनने, सीमेवरील स्थिती स्थिर आसल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात बोलताना चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन (Wang Wenbin) म्हणाले, 'आमच्या माहितीप्रमाणे, चीन-भारत सीमेवरील एकूण स्थिती स्थिर आहे. तसेच राजकीय आणि लष्कराच्या माध्यमाने सीमा मुद्द्यावर पुढील चर्चा सुरू आहे.
सीमेवरील थराराबद्दल राजनाथ सिंह काय म्हणाले?-अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दुपारी 12 वाजता लोकसभेत लेखी निवेदन वाचून दाखवले. "9 डिसेंबरला PLAच्या सैनिकांनी तवांग सेक्टरच्या यांगत्से भागात सीमेवील स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला आणि खंबीरपणे परिस्थितीला तोंड दिले. आपल्या सैनिकांनी धैर्याने PLAला भारताच्या प्रदेशात अतिक्रमण करण्यापासून रोखले आणि त्यांना त्यांच्या पोस्टवर जाण्यास भाग पाडले," अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी सीमेवरील थराराची माहिती दिली.
भारत-चीन चकमकीत दोन्ही बाजूचे काही सैनिक जखमी! -"या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चीनशी चर्चा सुरू आहे. मी सभागृहाला खात्री देऊ इच्छितो की आमचे सैन्य आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि आव्हान देण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडण्यास तयार आहे. सीमेवर झालेल्या संघर्षामध्ये दोन्ही बाजूचे काही सैनिक जखमी झाले आहेत. मी या सभागृहाला सांगू इच्छितो की आमचे सर्व जवान सुखरूप आहेत. कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. भारतीय लष्करी कमांडर्सने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे PLAच्या सैन्याने माघार घेतली," असे राजनाथ सिंह म्हणाले.