ऑनलाइन लोकमतवॉशिंग्टन, दि. 23 - भारतीय आयटी क्षेत्रातील नावाजलेल्या कंपन्या टीसीएस आणि इन्फोसिसनं एच-1बी व्हिसाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप अमेरिकेनं केला आहे. या कंपन्यांनी लॉटरी ड्रॉमध्ये व्हिसा मिळवण्यासाठी प्रमुख दावेदार होण्यासाठी अनेक अर्ज केल्याचंही निदर्शनास आल्याचं व्हाइट हाऊसच्या एका अधिका-यानं सांगितलं आहे. तो अधिकारी म्हणाला, तुम्हाला या कंपन्यांचं नाव माहीतच आहे. टीसीएस, इन्फोसिस आणि कॉग्निजेंट सारख्या कंपन्या जितके व्हिसा मिळवतात, त्यापेक्षा अधिक प्रमाणात ते अर्ज करतात. तसेच टीसीएस, इन्फोसिस आणि कॉग्निजेंट या कंपन्यांना आतापर्यंत सर्वाधिक एच-1बी व्हिसा प्राप्त झाले आहेत. या तीन कंपन्या स्वतःच्या कर्मचा-यांना 60,000 ते 65,000 अमेरिकी डॉलरच्या स्वरूपात मानधन देतात. सिलिकन व्हॅलीस्थित मध्यमवर्गीय कंपन्यांच्या इंजिनीअरलाही 1,50,000 अमेरिकी डॉलरमध्ये पगार देण्यात येतो. करार करणा-या कंपन्या स्किल्ड एम्प्लॉयर नसतात. त्या फक्त एंट्री लेव्हल पोजिशनसाठी कर्मचा-यांचा वापर करून घेतात. त्यामुळे व्हिसाचा मोठा हिस्सा त्या कंपन्यांना मिळतो. त्यामुळे त्या कंपन्या पब्लिक रेकॉर्डमध्ये येतात. मात्र व्हाइट हाऊसच्या या आरोपांवर या तिन्ही कंपन्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया अथवा स्पष्टीकरण आलं नाही. अधिका-यानं सांगितलं की, एच-1बी व्हिसा हा लॉटरीनुसार देण्यात येतो आणि हा व्हिसा मिळालेल्या 80 टक्के कर्मचा-यांना सरासरीपेक्षा कमी पगार दिला जातो. अमेरिकी कर्मचा-यांचं स्थान घेण्यासाठी मार्केट रेटपेक्षा कमी पगार देऊन इतर देशांतून कर्मचा-यांना आणण्यात येते. त्यामुळे एक प्रकारे हे व्हिसा कार्यक्रमाच्या नीतीचे उल्लंघन समजलं जातं.
TCS, इन्फोसिसवर एच-1बी व्हिसा नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
By admin | Published: April 23, 2017 9:52 PM