नवी दिल्ली - दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा म्होरक्या मुल्ला फजल उल्लाहला ठार करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने 13 जूनला केलेल्या ड्रोन हल्ल्यात मुल्ला फजल उल्लाह मारला गेला. 'वॉइस ऑफ अमेरिका' या अमेरिकेतील वृत्तसंस्थेनं शुक्रवारी या बातमीस दुजोरा दिला आहे.
अमेरिकी सैन्यातील अधिकाऱ्यांनी 'वॉइस ऑफ अमेरिका'सोबत संवाद साधताना सांगितले की, 13 जूनला पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या सीमारेषेवर असणाऱ्या कुनार प्रांतात दहशतवादविरोधी कारवाई करण्यात आली. अमेरिकेनं केलेल्या ड्रोन हल्ल्यात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा म्होरक्या मुल्ला फजल उल्लाह ठार मारला गेला.
कोण होता मुल्ला फजल उल्लाह?मुल्ला फजल उल्लाह हा तहरीक-ए-तालिबानचा म्होरक्या होता. त्यानं कित्येक दहशतवादी कारवायादेखील घडवून आणल्या आहेत. मुल्लानं 2012मध्ये नोबेल पुरस्कार विजेती मुलाला युसुफजईवरदेखील हल्ला केला होता. डिसेंबर 2014 मध्ये मुल्ला फजल उल्लाहने पाकिस्तानच्या पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवरदेखील दहशतवादी हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात जवळपास 130 मुलांसोबत एकूण 150 निष्पाप मृत्युमुखी पडले होते. याशिवाय 2010मध्ये त्यानं न्यू-यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर हल्ला करण्याचीही योजना आखली होती. अमेरिकेनं मुल्लावर 50 लाख डॉलरचं बक्षीसही घोषित केले होते.