न्यूयॉर्क ( Marathi News ): अमेरिकेतील नेवार्क येथे असलेल्या स्वामी नारायण मंदिरावर भारतविरोधी मजकूर लिहून त्या वास्तूची विटंबना करण्याचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तींनी केला. वर्णद्वेषातून हे कृत्य करण्यात आले असावे, असा पोलिसांचा कयास आहे.
या मंदिरावर ‘खलिस्तान’ शब्द लिहिण्यात आल्याचे सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या छायाचित्रांतून दिसून येते. स्वामी नारायण मंदिराची विटंबना करण्याचा प्रयत्न झाल्याच्या प्रकाराची माहिती पोलिसांना शुक्रवारी सकाळी ८.३५ वाजता मिळाली. वर्णद्वेषातून गैरकृत्ये करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्वामी नारायण मंदिराची विटंबना करण्याचा जो प्रयत्न झाला, त्याचा सॅनफ्रॅन्सिस्को येथील भारताच्या वाणिज्य दूतावासाने तीव्र निषेध केला आहे. मंदिरावर भारतविरोधी मजकूर लिहिण्यात आला होता. त्या घटनेने आमच्या भावना दुखावल्या, असे मत अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांनी व्यक्त केले आहे.