सेऊल : उत्तर कोरियाने बुधवारी सुमारे २३ क्षेपणास्त्रे डागून दक्षिण कोरियाच्या सागरी सीमेवर मोठा तणाव निर्माण केला. क्षेपणास्त्रांपैकी एक द. कोरियाच्या सागरी सीमेजवळ पडले. असा प्रकार पहिल्यांदाच झाल्याने दक्षिण कोरियानेही तीन क्षेपणास्त्रे डागून त्वरित प्रत्युत्तर दिले. या धामधुमीत दक्षिण कोरियाच्या एका बेटावर हवाई हल्ल्याचे सायरन वाजले आणि तेथील रहिवाशांना बंकरमध्ये स्थलांतरित व्हावे लागले.
सध्या दक्षिण कोरिया-अमेरिकेच्या लष्करी कवायती सुरू आहेत आणि त्यावर उत्तर कोरिया नाराज आहे. लष्करी कवायतींचा निषेध करीत उत्तर कोरियाने अमेरिका आणि दक्षिण कोरियाला इतिहासातील सर्वात मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर काही तासांतच उत्तर कोरियाने २३ क्षेपणास्त्रे डागली. दरम्यान, उत्तर कोरियाबद्दल अमेरिकेचा कोणताही प्रतिकूल हेतू नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
जैवास्त्रांच्या दाव्यांवर मतदान घेण्याची रशियाची मागणी
संयुक्त राष्ट्रे : अमेरिकेच्या पाठिंब्याने युक्रेन आपल्या देशात जैविक अस्त्रे तयार करण्यासाठी प्रयोगशाळांचे जाळे उभारत आहे, असा आरोप रशियाने केला असून त्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी एक आयोग स्थापन करावा, यावर बुधवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मतदान घेण्यात यावे, अशी मागणी रशियाने केली आहे.
विक्रमी चाचण्या
दक्षिण कोरियातर्फे सांगण्यात आले की, उत्तर कोरियाने बुधवारी त्यांच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर किमान २३ क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली. ही क्षेपणास्त्रे कमी पल्ल्याची किंवा पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी होती. तसेच कोरियाने २०१८ मध्ये तयार केलेल्या पूर्व सागरी बफर झोनमध्ये उत्तर कोरियाने सुमारे १०० तोफगोळ्यांचा मारा केला. उत्तर कोरियाने बुधवारी प्रक्षेपित केलेली २३ क्षेपणास्त्रे आतापर्यंत एका दिवसातील विक्रमी क्षेपणास्त्र चाचण्या आहेत.