बीजिंग: कोरोना संकटामुळे संपूर्ण जगाला संकटात टाकणारा चीन आता नव्या अडचणीत सापडला आहे. लोकसंख्येच्या जोरावर चीननं उत्पादन केंद्र अशी ओळख जगभरात निर्माण केली. मात्र आता याच लोकसंख्येमुळे चीनसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. चीनमधील वृद्धांचं प्रमाण वाढत आहे. अधिक अपत्यांना जन्म देण्यासाठी तयार करण्यात आलेलं धोरण अपयशी ठरलं आहे. विवाह दरात सातत्यानं घट होत आहे. २०२१ च्या पहिल्या तिमाहीत नवदाम्पत्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे चीनची चिंता वाढली आहे.
चीन सरकारच्या नागरी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या आकड्यांची तुलना केल्यास, तिसऱ्या तिमाहीत १७ लाख जोडपी विवाह बंधनात अडकली. केवळ कोविड-१९ महामारीमुळेच लग्नसंख्येत घट झालेली नाही. सरकारकडून देण्यात आलेली आश्वासनं अपूर्ण राहिल्यानंदेखील अनेकजण विवाहाचा निर्णय टाळत आहेत. चायनीज कम्युनिस्ट पक्षाच्या यूथ विंगनं नुकतंच एक सर्वेक्षण केलं. त्यात सहभागी झालेल्या जवळपास ३००० जणांनी आता आपल्याला आयुष्यात जोडीदाराची गरज नसल्याचं मत मांडलं.
आपल्याला लग्न करायचं नसल्याचं, आपण याबद्दल विचार करत नसल्याचं मत एका सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४३ टक्के महिलांनी व्यक्त केलं. लग्नाबद्दल चिनी तरुणांच्या मनात असलेल्या अनिश्चिततेचं कारण आर्थिक स्थितीशी संबंधित आहे. श्रीमंत शहरातील तरुण वर्ग लहान शहरांच्या तुलनेत लग्नाशिवाय राहणं पसंत करतो. अर्थव्यवस्था जितकी विकसित होईल, तितकेच अधिक लोक एकटं राहणं पसंती करतील, असं अहवाल सांगतो.
देशाचा आर्थिक विकास होत आहे. अशा स्थितीत लग्न न करणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. या अहवालामुळे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची चिंता वाढवली आहे. आधी चीननं लोकसंख्या नियंत्रणासाठी कठोर कायदे केले. मात्र आता नागरिकांनी अधिक अपत्यं जन्माला घालावीत यासाठी चीन सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. आता सुरू असलेला ट्रेंड कायम राहिल्यास येत्या काळात चीनमधील लोकसंख्येचा आलेख वेगानं खाली येईल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली.